सांगली : शासकीय अधिकारी हा कुणाचा असतो, हे साºयांनाच माहीत आहे. मी यापूर्वी जिल्ह्यात प्रांत, उपजिल्हाधिकारी पदावर भरपूर काम केले आहे. माझ्या कामाची पद्धत सांगलीकरांना नवी नाही. त्यामुळे कुणी माझ्यावर आरोप केले, तर ते जनतेला पटणारे नाहीत. माझ्या कार्यक्षमतेबाबत शासन निर्णय घेईल. महापालिका प्रशासनाचा प्रमुख म्हणून कोणत्याही राजकीय वक्तव्याला मी थारा देत नाही, अशा शब्दात बुधवारी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी महापौरांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.महापौर हारूण शिकलगार यांनी आयुक्तांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवत, विकासकामे झाली नाहीत तर अविश्वास ठराव आणण्याचा इशारा मंगळवारी दिला होता. त्यानंतर बुधवारी पत्रकार बैठकीत आयुक्तांनी महापौरांचे नाव न घेता हे आरोप खोडून काढले. ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करीत असताना नागरिकांचे प्रश्न व कायदा यांची सांगड घालून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करावे लागते. आयुक्त म्हणून या पदाचे अवमूलन होणार नाही, याची खबरदारी मी घेत आहे. कोणत्याही वा कोणाच्या दबावाने काम करीत नाही व भविष्यात करणारही नाही. नागरिकांच्या प्रश्नांबाबत मी संवेदनशील असून ते सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही गैरसमज नाहीत. वाईट हेतूने मी काम करीत नाही. माझ्या मनात काहीच नाही, तर दुसºयाच्या मनातील मी कसे काय सांगू शकतो. यापूर्वी जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी म्हणून काम केले. तेव्हा कुणी मला विचारले नाही, असा सवाल करीत, आयुक्तांनी भाजप व दोन आमदारांसंदर्भात होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले.खड्ड्यांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, सांगलीतील जनतेला खड्डेमुक्त शहर हवे आहे. पण त्यासाठी आवश्यक निधी, तांत्रिक कर्मचारी, त्यांचा कामाचा आवाका या गोष्टीही पाहाव्या लागतात. खड्ड्यांचा प्रश्न केवळ सांगलीतच आहे, असे नाही. पण तो सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या २७ रोजी जिल्हाधिकाºयांनी खड्डेप्रश्नी बैठक बोलाविली आहे. तत्पूर्वीच आम्ही ठोस आराखडा तयार करून खड्डेमुक्तीचे नियोजन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.२४ कोटींची कामे पंधरा दिवसांत सुरूमहापालिका क्षेत्रात रस्त्यांच्या दुरूस्तीची २४ कोटींची कामे पंधरा दिवसांत सुरू होतील. सध्या ३२ पैकी १६ कामे सुरू आहेत. या कामासाठी निधीची कमतरता नाही. जिल्हा नियोजन समितीकडे १५ कोटींसाठी प्रस्ताव दिला आहे. जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील हेही सकारात्मक आहेत. उर्वरित ८ ते ९ कोटींचा निधी महापालिकेला घालावा लागेल. तितका निधी घालण्याची पालिकेची क्षमता आहे. केवळ पावसामुळे या कामांना विलंब झाला आहे. त्यातून ठेकेदारांचे काही प्रश्न असतील तर, त्यांची बैठक घेऊन ते निकाली काढू. नागरिकांनीही रस्त्यांच्या कामावर लक्ष ठेवावे, असे आवाहनही खेबूडकर यांनी केले.
माझ्या कार्यक्षमतेचा निर्णय शासन घेईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:15 AM