सांगली : भारताच्या राजधानीत संविधानाची होळी केली जाते, तरीसुद्धा पंतप्रधान गप्प राहतात. भाजप सरकारला संविधान नव्हे, तर मनुवाद हवा आहे, हे यावरून सिद्ध होत असल्याचा आरोप माजी मंत्री, राष्टÑवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी बुधवारी येथे केला.राष्ट्रवादीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रात संविधान बचाव मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत सांगलीत राजमती भवनमध्ये बुधवारी सभा पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुमनताई पाटील, आ. विद्याताई चव्हाण, प्रदेश सचिव सुरेखा ठाकरे, राजलक्ष्मी भोसले, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महिला आघाडीच्या विनया पाठक, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, इलियास नायकवडी, ताजुद्दीन तांबोळी आदी उपस्थित होते.फौजिया खान म्हणाल्या, केवळ ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा देणाऱ्या सरकारने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत बघ्याची भूमिका स्वीकारली. त्यांचेच आमदार मुली पळविण्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे सरकारचे धोरण लोकांसमोर स्पष्ट झाले आहे. साडेतीनशे रुपयांचा गॅस ८२० रुपये झाला. पेट्रोल शंभरी गाठत आहे. दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र रोजगार मिळाले नाहीत. महिला असुरक्षित आहेत. दुसरीकडे जाती-पातीची भांडणे सुरू आहेत. राफेलसारखे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे.आ. विद्याताई चव्हाण म्हणाल्या, संविधानामुळे सर्वसामान्यांना अधिकार मिळाले आहेत. ते अधिकार हिरावून घेण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशात मोदींची हिटलरशाही सुरू आहे. हे आता सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र यामध्ये बॉम्बस्फोट करून समाज बदनाम करण्याचा उद्योग काहींनी केला होता.प्रदेश सचिव सुरेखा ठाकरे, राजलक्ष्मी भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्षा छायाताई पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्वप्नील जाधव, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, देवराज पाटील आदी उपस्थित होते. आभार संजय बजाज यांनी मानले.मनुस्मृतीचा बचाव!मनुस्मृतीची होळी करताना पोलिसांकडून मज्जाव केला जातो. यावरूनच सरकारची मनुवादी भूमिका स्पष्ट होत आहे. सांगलीतही आंदोलनावेळी आम्हाला सरकारच्या बाबतीत हाच अनुभव आला. आम्ही या गोष्टीबद्दल शासनाचा निषेध करीत आहोत, असे फौजिया खान यावेळी म्हणाल्या.
सरकारला हवाय मनुवाद:फौजिया खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:25 PM