इस्लामपूर : शासकीय परिपत्रकानुसार गावठाणातील जागा सैनिकांना घरबांधणीसाठी शासकीय दरात दिल्या जातात. या नियमानुसार साखराळे (ता. वाळवा) येथील जागा रहिवासी असलेल्या चार सैनिकांना प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या आदेशाने देण्यात आल्या. परंतु हा आदेशच रद्द केला. या निषेधार्थ हे सैनिक आपल्या कुटुंबासह २६ जानेवारी या स्वातंत्र्यदिनी उपोषणाला बसणार आहेत.
याबाबत माहिती अशी की, सचिन भगवान पवार (माजी सैनिक), गणेश बाबूराव बोकारे (सैनिक), महेश मानसिंग उथळे (सैनिक), सुभाष बजरंग शिंदे (माजी सैनिक, सध्या पोलीस रा. साखराळे, ता. वाळवा) यांना शासकीय आदेशानुसार साखराळेच्या गावठाण हद्दीतील सिटी सर्व्हे नं. २९३ मधील प्रत्येकाला तीन ते साडेतीन गुंठ्याची जागा देण्याचा आदेश प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी ४ सप्टेंबर २०२० रोजी दिला. या आदेशातच संबंधित जागेचे पैसे शासन तिजोरीत भरा, असेही नमूद होते. त्याप्रमाणे या सैनिकांनी अंदाजे तीस लाख रुपये शासनाकडे भरले. आता फक्त प्रतीक्षा होती, जागा ताब्यात घेण्याची.
संबंधित चार सैनिकांनी तीस लाख रुपये भरताना कर्ज व सोने तारण देऊन पैसे उभे केले होते. परंतु तीन महिने जागा ताब्यात देण्याविषयी कोणतेही आदेश आले नाहीत. उलट २० जानेवारी २०२१ रोजी प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी कोतवालामार्फत, ही जागा गावठाणात नसून शासनाची आहे. त्यामुळे ही जागा आपणास देता येणार नाही, असा आदेश बजाविला. परंतु या आदेशावर २० ऑक्टोबर २०२० ची तारीख आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी नागेश पाटील यांना सैनिकांनी विचारणा केली असता, ही जागा शासनाची असल्याने आपणास देता येणार नसल्याचे सांगितले. यावर याच गावठाणातील जागा काही सैनिकांना कशी दिली, असाही मुद्दा उपस्थित केला आहे. शासनाने न्याय दिला नाही तर स्वातंत्र्यदिनी हे सैनिक प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे नोटिसीद्वारे कळविण्यात आले आहे.