दरीबडची : कुलाळवाडी (ता. जत) येथील जि.प. शाळेतील उपक्रमशील गुरुजी भक्तराज गर्जे यांना निरोप देताना मुलांना गहिवरून आले. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. या भावपूर्ण प्रसंगाचे साक्षीदार असलेले पालक आणि ग्रामस्थ यांना गलबलून आले.जत पूर्व भागातील कुलाळवाडी म्हणजे ऊसतोड मजुरांचे गाव आहे. सहशिक्षक म्हणून भक्तराज गर्जे यांची २०१० मध्ये नेमणूक झाली. मूळ गाव पाडळी (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असलेल्या गर्जे यांनी १३ वर्षे ज्ञानदान केले. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली. टँकरमुक्तीसाठी प्रयत्न केले. गावाचा सन्मान झाला. विद्यार्थ्यांना बीजगोळेचे प्रशिक्षण दिले. शाळेत नर्सरी व सायन्स पार्क उभा केला. माळरानावर ५ हजार झाडांची लागवड व जोपासना केली.मुले शिक्षण अर्धवट सोडून आई-वडिलांसोबत ऊसतोडीला जात होती. त्यामुळे घरी भाकरी कोण करणार? हा प्रश्न होता. त्यामुळे शाळेतच त्यांनी २०१६ पासून माझी भाकरी उपक्रम राबविला. भाकरी थापण्यापासून ते भाजण्यापर्यंत विद्यार्थ्यांना स्वयंपाक शिकविला. कुटुंबातील विद्यार्थ्यांचा भाकरीचा प्रश्न मिटला. मुलांची शाळाही सुरू राहिली. उपक्रमातून स्त्री-पुरुष समानता, समस्या निराकरणाचे मूल्ये शिकविली. स्थलांतरित शासनाने या उपक्रमाची दखल घेतली. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचे लाडके शिक्षक गर्जे यांची जळगाव जिल्ह्यातील वलठाण (ता. चाळीसगाव) येथे विनंती बदली झाली.आपले शिक्षक जाणार म्हटल्यावर निरोप देण्यासाठी अख्खा गाव जमला. यावेळी गुलाब ठोंबरे, वैभवी धडस, सुषमा कुलाळ, जान्हवी परीट या मुलांनी मनोगत व्यक्त केले. अनेक विद्यार्थ्यांचा बांध फुटला. पालक, ग्रामस्थांनाही गलबलून आले.गर्जे यांनी कामाचे व यशाचे श्रेय सहकारी शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना दिले. गुरुजी निघाले तेव्हा मात्र मुले-मुली त्यांच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडत होती. या मुलांच्या मातांनी गुरुजींची दृष्ट काढून ओवाळणी केली. आपल्या मुलांचे लाडके शिक्षक आता जाणार हे पाहून त्यांनीही पदराने डोळ्यातील आसवे मोठ्या कष्टाने टिपली.
शाळा बनली मॉडेल स्कूलशाळा मॉडेल स्कूल म्हणून निवडली गेली आहे. साठ लाखांची कामे सुरू आहेत. पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून, २४० पट आहे. सात शिक्षक आहेत. भक्तराज गर्जे यांनी केलेले कार्य तालुक्याच्या पूर्व भागात कायम आठवणीत राहणार आहे.