संख : स्वस्त धान्य दुकानेच जीवनाचा आधार बनली आहेत. असे असतानाच पुरवठा विभागाच्या दुर्लक्षाने जत तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराकडून आधार कार्डाच्या नावाखाली ग्राहकांना माल देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आधार कार्डाची कोणतीही सक्ती नसताना, वरुन तोंडी आदेश आहे, असे म्हणून सक्ती केली जात आहे. धान्याविना ग्राहकांवर परत जाण्याची वेळ आली आहे. हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे.सर्व कार्डधारकांचा माल तालुक्यातून उचलला जातो. मग तो कुठे जातो? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुकान चालक तुपाशी अन् ग्राहक मात्र उपाशी, अशी ग्राहकांची स्थिती झाली आहे. याबाबत पुरवठा अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतली आहे. ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे.कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यामध्ये मध्यम व गरीब वर्गातील लोकांसाठी स्वस्त धान्य दुकानातील धान्य व वस्तू याच आधार आहेत. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप व रब्बी हंगामातील पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे लोकांना धान्यासाठी पूर्णपणे स्वस्त धान्य दुकानदारावरच अवलंबून राहावे लागत आहे. तालुक्यामध्ये एपीएल कार्ड धारकांची संख्या ५३३२५, बीपीएल कार्डधारक ४०९९, अंत्योदय ३००८, शुभ्र कार्डांची संख्या ३२८०, तर अन्नपूर्णा कार्डांची संख्या ३५१ इतकी आहे. आश्रमशाळा, वसतिगृहे यांच्या कार्डांची संख्या २६ इतकी आहे. पुरवठा विभागाने स्वस्त धान्य कार्डे आधार कार्डने लिकिंग करण्याची सक्ती केली आहे. बोगसगिरी टळून, धान्य पुरवठा सुलभ होण्यासाठी आधार कार्ड नंबर देणे आवश्यक आहे. कार्डावर नावे असलेल्या ग्राहकांचे आधार नंबर सक्तीचे केले आहेत. आधार कार्ड नसेल तर स्वस्त धान्य दुकानदार माल न देता परत पाठवीत आहे. गरीब लोकांना यामुळे धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. (वार्ताहर)आधार कार्ड मोहीम नाहीचप्रत्येक गावात आधार कार्ड काढण्याची मोहीम राबविणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दुकानदारांनी दिवसही दिला होता. पण आधार कार्डे काढण्यात आलेली नाहीत.दुकानदारांना आधार कार्ड नसेल तर धान्य देऊ नका, असे सांगितलेले नाही. एक-दोन वेळा समज द्यावी. आधार कार्ड काढण्यास सांगावे. आधार कार्डाची सक्ती करुन धान्य अडविले असेल, तर त्याची चौकशी करु.- बाळासाहेब कोळी,तालुका पुरवठा अधिकारी
‘आधार’च्या नावाखाली धान्य वितरण ठप्प
By admin | Published: January 01, 2016 11:31 PM