सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी गेल्या आठवड्यापासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी अखेर संपली. बुधवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅली काढून तर काही ठिकाणी नेत्यांच्या सभा घेत प्रचाराची सांगता करण्यात आली. प्रचार संपला असला तरी अंतर्गत प्रचाराला आता सुरुवात झाली असून उद्या, शुक्रवारी प्रत्यक्षात मतदान होणार आहे.
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. यातील ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता १४३ ठिकाणी निवडणुका होत आहेत. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर प्रचार सुरू झाला होता. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामीण भागात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.
बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत प्रचाराची मुदत होती. त्यानुसार गावांमध्ये मोटारसायकल रॅली, घरोघरी भेटीचा कार्यक्रम करून तर काही गावांमध्ये मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत सांगता सभा घेण्यात आल्या. शुक्रवारी प्रत्यक्षात मतदान होणार आहे तर सोमवार, १८ रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.