सांगली : ग्रामीण भागात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह दोन विषय समिती सभापतींचा कस लागणार असून, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, ग्रामीण भागात राजकारण शिगेला पोहोचले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते. आता ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक असल्याने आपल्या पॅनलला, समर्थकांना निवडून आणण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार विषय समिती सभापतींच्या गटातील जवळपास १२ ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीच्या लढती असून, यामध्ये कोण बाजी मारणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
चौकट
चौकट
जिल्हा परिषद अध्यक्षांचा म्हैसाळ गट
म्हैसाळ गटाचे सदस्य प्राजक्ता कोरे हे २,३४६ मताधिक्क्याने निवडून आले होते. सध्या ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. या गटातील म्हैसाळ, विजयनगर या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. विजयनगरमध्ये त्यांचीच सत्ता असून, ती ताब्यात ठेवण्यासाठी तसेच समर्थकांना निवडून आणण्यासाठी त्यांचा कस लागणार आहे. यामध्ये कोण बाजी मारतो? याकडे लक्ष लागून आहे. म्हैसाळ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.
चौकट
जि. प. उपाध्यक्षांचा कवलापूर गट
कवलापूर गटाचे सदस्य शिवाजी डोंगरे यांनी ३५८ मताधिक्क्याने विजय मिळविला होता. ते सध्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असून, त्यांच्या गटातील एकमेव कवलापूर ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. कवलापूर ग्रामपंचायत विरोधी गटाच्या ताब्यात होती. सत्तांतर करण्यासाठी डोंगरे यांची मोठी कसोटी लागणार आहे.
चौकट
शिक्षण सभापतींचा रांजणी जि. प. गट
रांजणी गटाचे सदस्या आशा पाटील यांनी २,१३६ मते जास्त घेत प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली होती. ते सध्या आरोग्य व शिक्षण सभापती असून, या गटातील एकाही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही. पण, त्यांचे म्हैसाळ एम हे गाव असून, येथील निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
चौकट
समाजकल्याण सभापतींचा मांजर्डे गट
मांजर्डे गटाचे सदस्य प्रमोद शेंडगे यांनी २,१७७ मताने विजय मिळविला होता. ते सध्या समाजकल्याण सभापती असून, या गटातील धोंडेवाडी, हातनूर, मांजर्डे, माेराळे, पेड, गौरगाव, विजयनगर, नरसेवाडी या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी त्यांना राजकीय व्यूहरचना आखावी लागणार आहे.