भिलवडी : भिलवडी व्यापारी संघटनेच्या वतीने ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या महिला अध्यक्षा मीना मदने, अंकलखोपच्या माजी सरपंच श्वेता बिरनाळे व भिलवडीच्या प्रगतिशील महिला शेतकरी उज्ज्वला पाटील या विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
सरपंच सविता महिंद-पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांच्यासह नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर शिवजयंतीदिनी झालेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेते स्पर्धक सिद्दीक जमादार, चेतन भोसले यांना शिवप्रतिमा देऊन गौरविण्यात आले. यावेळी मीना मदने म्हणाल्या की, व्यापारी संघटनेने कोरोनाकाळात केलेले काम आणि रक्ताची टंचाई असताना आयोजित केलेले रक्तदान शिबिर जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरले.
श्वेता बिरनाळे म्हणाल्या की, आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रांमध्ये महिला काम करीत आहेत. ५० टक्के आरक्षण असल्यामुळे राजकीय क्षेत्रातही महिलांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे.
यावेळी राज्यस्तरीय सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेचे संचालक सचिन नावडे यांचाही सत्कार करण्यात आला.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी स्वागत, दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन, तर सचिव महेश शेट्टे यांनी आभार मानले. उपाध्यक्ष दिलीप कोरे रणजीत पाटील, खजिनदार दिलावर तांबोळी, सहसचिव विजय शिंदे सर्व संचालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : २८ भिलवडी १
ओळ : भिलवडी (ता. पलुस) येथे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार सरपंच साविता महिंद, मीना मदने, श्वेता बिरनाळे, उज्ज्वला पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.