मालेगाव : एखादी महिला निवडून आली की सर्वाधिक रुबाब वाढतो तो त्यांच्या पतिराजांचा किंवा त्यांच्या मुलांचा. त्यांच्याकडून अनेकदा कामकाजात ढवळाढवळ केली जाते. याच पार्श्वभूमीवर रावळगाव ग्रामपंचायतीने अशा ‘नवरोबांना’ कार्यालयात येण्यास मज्जाव करणारा ठराव संमत केला आहे. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण प्राप्त झाले असून, रावळगाव ग्रामपंचायतीमध्ये एकूण नऊ महिला सदस्य निवडून आल्या आहेत. त्यामध्ये सरपंचपद हे आदिवासी महिलेसाठी आरक्षित आहे. परंतु सरपंच पती व काही महिला सदस्यांची मुले ग्रामपंचायतच्या कारभारात ढवळाढवळ करीत असून, त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात येण्यास मज्जाव करावा अन्यथा त्यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात येईल, असा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदस्य व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गरुड यांनी मांडला. या ठरावाला सर्व सदस्यांनी मान्यता दिली. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीत पतिराजांना बंदी
By admin | Published: November 11, 2015 10:54 PM