लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : कांदे (ता. शिराळा) येथे खेळता-खेळता तळ्यामध्ये पडलेल्या समर्थ राहुल कुंभार (वय २ वर्षे) या नातवास त्याचे आजोबा बाळासाहेब रघुनाथ कुंभार यांनी वाचविले. परंतु नातवाला वाचविताना तेही तळ्यातील जलपर्णीत अडकले. त्यांना परिसरातील महिलांनी काठीचा आधार देत बाहेर काढले.कांदे गावात ग्रामसचिवालयाच्या पिछाडीस बांधीव तळे आहे. त्यामध्ये जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंगळवारी, १५ आॅगस्टरोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान समर्थ हा बालक खेळत खेळत तळ्याजवळ गेला व पाण्यात पडला. तो पाण्यात बुडू लागला. यावेळी जवळच असलेले त्याचे आजोबा बाळासाहेब कुंभार यांना तो बुडताना दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच पाण्यात उडी मारली आणि समर्थला वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी समर्थला पाण्याबाहेर काढलेही. मात्र ते या तलावातील जलपर्णीच्या विळख्यात अडकले. त्यांना त्यातून सुटका करून घेता येत नव्हती.यावेळी येथील रस्त्यावरून जाणाºया सुवर्णा कुंभार, प्रियांका पाटील, रंजना कुंभार या महिलांनी ही घटना पहिली. त्यांनी प्रसंगावधान राखत बाळासाहेब कुंभार यांना काठीचा आधार देऊन तलावातून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचविले.यापूर्वी दोन बळी..!जलपर्णीमुळे कांदेतील हा तलाव धोकादायक बनला आहे. या तलावात याअगोदर दोन व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला आहे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
ंकांदेमध्ये आजोबांनी वाचविले नातवाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:11 AM