सांगली : कोरोनाचे लसीकरण संसर्गापासून वाचवू शकत नसले तरी तुम्हाला मृत्यूच्या जबड्यातून खेचून आणते, हे मात्र निश्चित. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या तीन आजींनी जणू हे सप्रमाण दाखवून दिले आहे. मिरजेत शासकीय तंत्रनिकेतनमध्ये महापालिकेच्या केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या तीन वृद्धा लसीकरणामुळे संसर्गानंतरही धोक्याबाहेर आहेत. कोरोनाचा टेंडू त्यांनी सीमेपार टोलवला आहे.
८० ते ९० वयोगटातील तीन महिला तंत्रनिकेतनमधील केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तिघींनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याने कोरोना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करू शकला नाही. यापैकी दोघींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असला तरी प्रत्यक्षात कोणतीही लक्षणे नाहीत किंवा त्रास होत नाही. त्यांच्या कुटुंबियांनी सजग राहून मार्चमध्येच पहिला डोस दिला, नंतर दुसरा डोसही पूर्ण केला. वयाच्या नव्वदीतही प्रकृती ठणठणीत असणाऱ्या या वृद्धा पहिल्या लाटेमध्ये कोरोनापासून सुरक्षित होत्या. दुसऱ्या लाटेतही संसर्गापासून दूर राहिल्या. लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याच्या काही दिवसांनंतर बाहेरील संपर्कामुळे कोरोनाची बाधा झाली. सुरुवातीला थोडाफार ताप आल्याने चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली. ऑक्सिजन पातळी चांगली असल्याने महापालिकेच्या केअर सेंटरमध्ये दाखल केले; पण तेथेही फार मोठ्या उपचारांची गरज लागली नाही. लसीकरणानंतर शरीरात प्रतिजैविके तयार झाल्याने कोरोनाला समर्थपणे तोंड देऊ शकल्या. या तीनही वृद्धा ठणठणीत असून, चौदा दिवसांच्या विलगीकरणानंतर डिस्चार्ज मिळेल. कोरोना टाळायचा तर लसीशिवाय पर्याय नाही हे त्यांनी दाखवून दिले. रुग्णालयांत लाखोंचा खर्च करण्याऐवजी सरकारची मोफत लस घेणे कधीही सुरक्षित, असा संदेश दिला.
कोट
कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या वृद्धा सध्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कोरोनाचे उपचार घेत आहेत. तिघींचीही प्रकृती अत्यंत चांगली आहे. एका वृद्धेला तर फॅबी फ्ल्यू गोळ्यांशिवाय अन्य उपचारांची गरज भासली नाही.
- डॉ. वैभव पाटील, कोरोना नोडल अधिकारी, महापालिका