सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ फुटू लागले आहेत. मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू असताना, राजकीय पक्षांनी वरिष्ठ नेत्यांच्या सभा, बैठका, रॅलींचे नियोजनही सुरू केले आहे.येत्या २२ रोजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचार प्रारंभाने नेत्यांच्या रणधुमाळीला सुरूवात होईल. तसेच भाजप, शिवसेनेसह सर्वच पक्षांनी केंद्र व राज्य पातळीवरील नेत्यांना महापालिका निवडणूक मैदानात उतरविण्याची तयारी चालविली आहे. आजी-माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पक्षप्रमुख, प्रदेशाध्यक्षांसह मतांच्या धुव्रीकरणासाठी त्या त्या जातीचे नेतेही सांगलीत येणार आहेत.
उमेदवारी अर्ज माघारीनंतर खऱ्याअर्थाने आता रस्त्यावरील प्रचाराला सुरूवात झाली आहे. पावसाचा जोर वाढला असला तरी, उमेदवारांच्या उत्साहालाही उधाण आले आहे. चिखल तुडवत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. उमेदवारांचा उत्साह कायम ठेवण्याबरोबरच राजकीय वातावरण तापविण्यासाठी पक्षांकडूनही दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी निवडणुकीच्या प्रचारात राज्यातील दिग्गज नेत्यांना उतरविण्याचे नियोजन सुरू झाले आहे.
सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराचा संयुक्त प्रारंभ २२ रोजी सांगली, मिरज व कुपवाड या तीनही शहरात करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता सांगलीतील कच्छी जैन भवन, पाच वाजता कुपवाड येथे, तर सायंकाळी सात वाजता मिरजेतील शेतकरी भवनात काँग्रेस-राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, आ. विश्वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रचार सांगतेसाठी दि. २९ रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह दिग्गज नेते आणण्याचे नियोजन सुरू आहे. त्याशिवाय पक्षाचे आमदार, स्टार प्रचारकांनाही निमंत्रित केले जाणार आहे.राष्ट्रवादीनेही उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांची फौज उतरविण्याचे ठरविले आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. छगन भुजबळ, आ. जितेंद्र आव्हाड यांच्यापासून ते युवक, युवती राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनाही प्रचारासाठी आणले जाणार आहे. शेवटच्या टप्प्यात धनंजय मुंडे व अजित पवार यांना मैदानात उतरविण्याची तयारी केली आहे.भाजपने तर केंद्र व राज्य पातळीवरील नेत्यांना प्रचारासाठी निमंत्रित केले आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्यापासून ते अगदी पुण्याच्या महापौर मुग्धा टिळक यांच्यापर्यंत अनेक नेत्यांना प्रचारासाठी आणले जाणार आहे. याशिवाय पालकमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही रसद भाजपच्या उमेदवारांना असेल. दि. २८ रोजी सांगली व मिरजेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहीर सभेचे नियोजनही केले जात आहे. काही नेत्यांच्या रोड शोचेही आयोजन केले आहे. सोशल मीडियावरील हायटेक प्रचाराचेही नियोजन भाजपच्यावतीने करण्यात येत आहे.
शिवसेनेने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. जवळपास ५१ उमेदवार चिन्हावर लढत असून, ७ अपक्षांना पुरस्कृत केले आहे. त्यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे आदित्य ठाकरे, मंत्री रामदास कदम, खा. चंद्रकांत खैरे, खा. गजानन कीर्तीकर, मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते यांच्यापासून प्रमुख पदाधिकारीही प्रचारात उतरणार आहेत. जिल्हा सुधार समिती, बसप, भारिप बहुजन महासंघ, आप व इतर पक्षांचे नेतेही प्रचारासाठी सांगलीत येणार आहेत.भाजपची ‘वॉर रूम’ : निवडणुकीसाठी सज्जपहिल्यांदाच स्वबळावर महापालिकेची निवडणूक लढविणाºया भाजपने महावीर उद्यानाजवळील प्रमुख प्रचार कार्यालयात ‘वॉर रूम’ बनवली आहे. दररोज राज्यपातळीवरील किमान एका बड्या नेत्याची तरी हजेरी राहावी, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची शक्यता लक्षात घेता, त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे. याशिवाय विरोधकांकडून होणाºया आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठीची यंत्रणाही या वॉर रुममध्ये उभारली जात आहे. तसेच प्रभागनिहाय रोड शो आणि रॅलीचे वेळापत्रकही ठरवले जात आहे.नेत्यांचे नियोजित दौरे...२२ जुलै :- काँग्रेस-राष्ट्रवादी प्रचार प्रारंभ; उपस्थिती : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील२६ जुलै - युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सांगली, मिरजेत रोड शो२७ जुलै - एमआयएमचे आमदार अकबुरुद्दीन ओवेसी यांची सभा२८ जुलै- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगली-मिरजेत सभा२९ जुलै - अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवेसी यांच्या सभा