लोकमत न्यूज नेटवर्क--सांगली : महापालिकेच्या मागासवर्गीय समितीच्या सभापती निवडीत सत्ताधारी काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर महापौर हारुण शिकलगार यांनी माजी महापौर विवेक कांबळे यांना जबाबदार धरत पाकिटाचे वजन मोजणाऱ्या कांबळे यांनी नवा घरोबा केल्याची खरमरीत टीका केली. तर कांबळे यांनी मदनभाऊंशी गद्दारी केलेल्यांचा पराभव करून त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचा दावा केला. मागासवर्गीय समितीत काँग्रेसचे संख्याबळ अधिक असतानाही सलग तिसऱ्यांदा सत्ताधाऱ्यांना पराभव स्वीकारावा लागला. या समितीच्या सभापतिपदासाठी अर्ज भरतेवेळीच महापौर हारुण शिकलगार व गटनेते किशोर जामदार यांनी काँग्रेसच्या सहा सदस्यांना एकत्र करून उमेदवार निश्चित करण्याचे अधिकार दिले होते. त्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांनी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याशीही चर्चा केली होती. अखेर काँग्रेसकडून अश्विनी कांबळे व सुरेखा कांबळे यांचे अर्ज दाखल करण्यात आले. शुक्रवारी निवडीवेळी अश्विनी कांबळे यांचा अर्ज मागे घेऊन सुरेखा कांबळे यांना निवडणूक रिंगणात उतरविले. पण माजी महापौर विवेक कांबळे यांनी काँग्रेसला मतदान न करता विरोधी राष्ट्रवादीच्या उमेदवार स्नेहल सावंत यांच्या पारड्यात मत टाकले. त्यामुळे संख्याबळ असतानाही काँग्रेसला पुन्हा सभापतिपदापासून दूर रहावे लागले. याची सल महापौर हारुण शिकलगार यांनी बोलून दाखत विवेक कांबळे यांच्यावर टीका केली. शिकलगार म्हणाले की, मागासवर्गीय समिती व गुंठेवारी समिती सभापती निवडी बिनविरोध करण्याचा विचार होता. तशी चर्चाही राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांच्याशी झाली होती. पण काँग्रेसच्या शेवंता वाघमारे व माजी महापौर कांचन कांबळे यांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. त्यानंतर माजी महापौर विवेक कांबळे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही अडचण नसल्याचे सांगितले. सर्वांना बरोबर घेऊन उमेदवार निश्चित केला, पण विवेक कांबळे यांनी दगा दिला. पाकिटाचे वजन मोजणारे विवेक कांबळे यांनी जुन्या घरात न येता नवा घरोबा केल्याची टीका केली. त्यावर विवेक कांबळे म्हणाले की, मदनभाऊ असताना ज्यांनी गद्दारी केली त्यांना मी मतदान करणार नाही, हे आधीच जाहीर केले होते. मी महापौर असताना बाळासाहेब गोंधळी यांना उमेदवारी देण्यात आली. त्याला मदनभाऊंनीही हिरवा कंदील दाखविला होता. तेव्हा काँग्रेसमधील काही सदस्यांना गोंधळींचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीला मतदान केले. राजकारणात संयम व नेत्यांचा शब्द महत्त्वाचा असतो. पण या सदस्यांनी तो पाळला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या या सदस्यांचा पराभव करून मी मदनभाऊंना श्रद्धांजली वाहिली आहे. पराभवाचा आनंद घ्या : कांबळेमदनभाऊ पाटील आजारी असताना त्यांचा शब्द न पाळता त्यांना त्रास देण्याचा उद्योग केलेल्यांना मी धडा शिकविला आहे. मागासवर्गीय समितीतील ज्या तीन सदस्यांनी गद्दारी केली होती, त्यांना विविध पदासाठी पराभवाला सामोरे जावे लागले. गतवेळी बाळू गोंधळी यांच्या पराभवानंतर याच सदस्यांनी आनंद व्यक्त केला होता. दुसऱ्याला निवडणुकीत पाडण्यात आणि स्वत: पडण्यात जो आनंद असतो, त्याचा अनुभव आज त्यांना आला असेल. आता त्यांनी पराभवाचाही आनंद घ्यावा, असा टोला माजी महापौर विवेक कांबळे यांनी लगाविला. कांबळेंची दुकानदारी : शिकलगारमागासवर्गीय समिती सभापती निवडीत माजी महापौर विवेक कांबळे यांनी काँग्रेसला दगा दिल्याचा आरोप महापौर हारुण शिकलगार यांनी केला. कांबळे यांना महापौर पद देणे ही मदनभाऊ पाटील यांच्या तीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठी चूक होती. अजूनही त्यांच्या नावावर कांबळे यांची दुकानदारी सुरू आहे, अशी टीकाही शिकलगार यांनी केली.
आजी-माजी महापौरांचे एकमेकांवर शरसंधान
By admin | Published: June 24, 2017 7:16 PM