बालपणापासूनच निसर्गत: लाभलेल्या लोकसंग्रहाच्या वेडातून आसपासच्या सवंगड्यांना एकत्र करून बालगोपाळांचा खेळ खेळता-खेळता या व्यक्तिमत्त्वाचे नेतृत्वात रूपांतर व्हायला लागले व आपल्या सवंगड्यांना चांगुलपणाचे मार्मिक धडे देता-देता ते बुवा कधी बनले हे कळालेच नाही.
सदृढ शरीरात चांगले आत्मे वास करतात. यानुसार युवकांच्यामध्ये खेळातून आदर्श गुणांचा विकास घडविण्याच्या दूरदृष्टीतून हणमंतराव पाटील यांनी पेठेमध्ये आत्मशक्ती क्रीडा मंडळ स्थापन करून गावातील युवकांसाठी कबड्डी, व्हॉलिबॉल, क्रिकेट या खेळांची दालने स्वतःच्या खर्चातून खुली केली. बघता-बघता पेठमधील युवकांची आधारशक्ती बुवांच्या रूपात आत्मशक्तीमध्ये स्थिरावू लागली व गावात विविध खेळांच्या स्पर्धा भरवून बुवांची ओळख पेठ व वाड्या वस्त्यांमध्ये विस्तारित होऊ लागली.
शांत, संयमी वृत्ती व किमयागार स्वभावामुळे बुवांचे व्यक्तिमत्त्व बहरू लागले. त्या बहरणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला जयवंतराव भोसले, युवा नेतृत्व सी. बी. पाटील यांच्या कुशल व प्रभावी मार्गदर्शनाची साथ व माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांचे राजकीय आशीर्वाद मिळाले व बुवांच्या रूपाने पेठेच्या पांढरीत युवा नेतृत्व साकारू लागले.
कॉलेज हे शिक्षण आणि राजकारणाचे जणू व्यासपीठच असते. कारण विद्यार्थी जीवनामध्ये विविध गुणांचे पैलू इथेच घडत असतात. कॉलेजच्या निवडणुकीच्या माध्यमातून बुवांचा समाजजीवनातील प्रवेश आत्मशक्तीचा अभूतपूर्व प्रभाव निर्माण करणारा ठरला व बुवांचं नेतृत्व पेठेच्या गावकुसाबाहेर वाळवा तालुक्यात युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाऊ लागले.
समाजकारणासाठी राजकारण हे तत्त्व स्वीकारून बुवांनी समाजकार्यावर अधिक भर दिला. सामाजिक कार्याला प्रचंड वेगाने व नेटक्या नियोजनाने सुरुवात झाली. पेठेमध्ये प्रगत विचारांचे वारे वाहू लागले. या विचारातून हणमंतराव पाटील यांनी १९८५ ला पेठेमध्ये ‘यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला’ सुरू केली व महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांना निमंत्रित करून पेठ परिसरामध्ये चांगले विचार रुजविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात आजही परंपरा सुरू आहे.
मनात समाज कल्याणाचा ध्यास घेऊन लोकांच्या वेदना, व्यथा, समस्या, आरोग्याच्या गरजा ओळखून कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने व स्वतःच्या आर्थिक दातृत्वातून विविध आरोग्य शिबिरांचे त्यांनी आयोजन केले. अशा समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून बुवांनी पेठेमध्ये आजही आपल्या स्मृती जिवंत ठेवल्या आहेत.
अर्थकारण समाजव्यवस्थेचा पाया असतो, म्हणून हणमंतराव पाटील यांनी तत्कालीन मंत्री शिवाजीराव देशमुख, प्रकाश आवाडे, प्रकाशबापू पाटील यांच्या सहकार्यातून आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील व्यक्तीपासून ते प्रसिद्ध उद्योजकांपर्यंत आर्थिक उपलब्धता करून दिली. आज ही संस्था एक सक्षम अर्थव्यवस्था असणारी पतसंस्था म्हणून नावारूपास आली आहे.
चांगल्या मूल्यांसाठी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे. ही दूरदृष्टी ठेवून मुलींच्या शिक्षणाची स्वतंत्र सोय करण्याच्या उद्देशाने आत्मशक्ती शिक्षण संस्था स्थापन करून २ जुलै १९८८ रोजी पेठ येथे कन्या विद्यालयाची स्थापना केली.
ज्या समाजात स्त्रीला सन्मानाची वागणूक दिली जाते, तो समाज सुसंस्कृत समजला जातो. या उद्देशाने प्रेरित होऊन महिला सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने २००५ मध्ये महिला पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. हे काम बुवांच्या पुरोगामी विचारांची ओळख करून देणारे होते.
बुवांच्या राजकीय व सामाजिक कार्यामध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. शिराळा विधानसभा मतदारसंघात पेठ गावाचा समावेश झाल्यानंतर आमदार मानसिंगराव नाईक यांना समर्थपणे पेठ व पेठ परिसरातून बुवांनी मोलाची साथ दिली. बुवांचे प्रसिद्ध उद्योगपती वनश्री नानासाहेब महाडिक यांच्याबरोबर राजकारणापलीकडेचे मैत्रीपूर्ण संबंध होते.
एक मानवतावादी कृती हजारो भाषणांपेक्षा श्रेष्ठ असते. यानुसार बुवा हे निश्चितच एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. जात, धर्म, गरीब-श्रीमंत यापलीकडे जाऊन त्यांनी समाजकारण, अर्थकारण, राजकारण केले. स्वतःच्या सुख-दुःखांची, कुटुंबाची, कुटुंबातील व्यक्तींची होणारी वाताहत या माणसाला समाजकारणापासून थांबवू शकली नाही. त्यांच्यातील ही अद्भुत शक्ती त्यांना समाजकारण करण्यास भाग पाडत होती. म्हणून त्या परमेश्वरचरणी हणमंतराव पाटील (बुवा) यांच्या पवित्र आत्म्याला शांती मिळावी हीच सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने प्रार्थना.
- नामदेव भांबुरे
कन्या विद्यालय, पेठ.