इस्लामपूर : येथील पेठकर कॉलनीतील ८० वर्षीय वृद्धाचा खून त्यांच्याच चुलत नातवाने पैशाच्या हव्यासापोटी केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने २४ तासांत छडा लावला. हंबीरराव शंकर साळुंखे-खोत (वय ८०) असे मृताचे नाव असून विशाल गुलाबराव साळुंखे (२७, रा. फारणेवाडी, ता. वाळवा) या संशयितास अटक केली. तो कापड दुकानातील व्यवसायात कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे पैसे उकळण्याच्या हेतूने त्याने हे कृत्य केले.विशालने हंबीरराव साळुंखे यांना पैसे मागितले होते. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला होता. हा राग त्याच्या मनात होता. दोन दिवसांपूर्वी त्याने त्यांच्या पत्नीला फोन केला होता. त्यावेळी त्या ठाण्याला गेल्याचे समजल्यावर हंबीरराव घरी एकटेच असल्याची त्याची खात्री झाली. रविवारी रात्री तो त्यांच्या घरी आला. तेथे त्यांच्याशी उशिरापर्यंत बोलत बसला. त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी नकार आल्याने रागाच्या भरात त्याने त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले.
या हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन ते निपचित पडले होते. त्यावर ही आत्महत्या भासावी यासाठी विशालने त्यांच्या गळ्यात दोरीचा गळफास घालून ती दोरी छताला बांधली. त्यांना ठार मारल्यानंतर त्याने रक्ताळलेल्या पायाने स्वयंपाक घरातही फेरी मारली होती. तेथून समोरील दरवाजातून बाहेर पडत बाहेरून कडी घालून दुचाकीवरून पलायन केले.इस्लामपूरचे पोलीस पथक आणि सांगलीच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक छडा लावण्यासाठी सक्रिय झाले होते. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची पाहणी करत आणि मोबाइलचा वापर लक्षात घेत विशाल साळुंखे याला त्याच्या गावातूनच अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. त्याला पुढील तपासासाठी इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.