विटा : मालमत्तेच्या वादातून दाेघा नातवांनी वृद्ध आजीचा टॉवेलने गळा आवळून खून केला. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता पारे (ता. खानापूर) येथे घडली. सखूबाई संभाजी निकम (वय ८०, मूळगाव चिंचणी-मंगरूळ, ता. खानापूर) असे मृत आजीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी नातू आशिष सतीश निकम, सून रेणुका सतीश निकम यांना अटक केली आहे, तर दुसऱ्या अल्पवयीन नातवास ताब्यात घेतले आहे.चिंचणी (मं.) येथील सखूबाई यांना सतीश निकम व संगीता साळुंखे अशी अपत्ये आहेत. सतीश निकम यांचा सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. त्यांची विटा, चिंचणी (मं.) यासह विविध ठिकाणी मालमत्ता आहे. यातील अर्धा हिस्सा सतीश यांचे जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करा, असे त्यांची पारे येथील बहीण संगीता रामचंद्र साळुंखे हिचे म्हणणे हाेते. त्याचा राग संशयित नातू आशिष, त्याचा अल्पवयीन भाऊ व सून रेणुका यांना होता. यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू हाेता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सखूबाई पारे येथे मुलगी संगीता हिच्या घरी राहत हाेत्या.
दि. १९ फेब्रुवारी रोजी सखूबाई यांची सून रेणुका, तसेच आशिष याच्यासह दुसरा अल्पवयीन नातू संगीता साळुंखे यांच्या पारे गावातील घरी आले. त्यांना ‘तू तुझ्या भावाला बोलावून घेऊन ४८ तासांच्या आत मालमत्ता फिरवून दे, नाही तर तुला व म्हातारीला (सखूबाई) ४८ तासांनंतर दाखवितो’, अशी धमकी दिली. यानंतर तिघेही विट्याला निघून गेले.त्यानंतर मंगळवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास तिघेही पुन्हा पारे येथे संगीता यांच्या घरी गेले. त्यावेळी सखूबाई याही घरी होत्या. तिघांनी पुन्हा वादावादी सुरू केली. सखूबाई यांना एका खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद केला. टॉवेलने गळा आवळून त्यांचा खून केला. त्यानंतर तिघेही संशयित त्यांच्या विटा येथील घरी आले.घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक विपुल पाटील, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून सखूबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.याप्रकरणी विटा पोलिसांनी मृत सखूबाई यांचा अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आशिष, सून रेणुका यांंना रात्री उशिरा ताब्यात घेतले. या घटनेची विटा पोलिसांत नोंद झाली असून निरीक्षक शरद मेमाणे पुढील तपास करीत आहेत.