दत्ता पाटील -- तासगाव --खरीप हंगाम वाया गेल्यामुळे शासनाकडून कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तासगाव तालुक्यासाठी १८ कोटी ३३ लाख ४१ हजार ४०५ रुपयांचे अनुदान प्रशासनाकडून जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र मार्चअखेरची कामे, शेतकऱ्यांच्या याद्यांची तपासणी, रकमांची जुळवाजुळव अशा तांत्रिक गोष्टीमुळे अनुदान गोगलगाईच्या गतीने पुढे सरकत आहे. शासनाचे अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी होत आहे.२०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचा खरीप हंगाम वाया गेला होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्रासाठी गुंठ्याला ६८ रुपयांप्रमाणे हेक्टरी ६ हजार ८०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, वाळवा या आठ तालुक्यांसाठी पहिल्या टप्प्यात ६९ कोटी ९१ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी तासगाव तालुक्याला १८ कोटी ३३ लाख ४१ हजार ४०५ रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. प्रशासनाकडून लाभार्थी शेतकऱ्यांचे क्षेत्र निश्चित करुन तासगाव तालुक्यातील ६१ हजार १४५ शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग करण्यासाठी ५ मार्चला जिल्हा बँककडे वर्ग करण्यात आले होते. मात्र अद्याप बँकेकडून हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाही. तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळाल्यास, शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे. मात्र अनुदान वर्ग करण्यास वेळ होत असल्याचे दिसून येत आहे. खरिपाच्या अनुदानाबाबत शेतकऱ्यांनी बँकेत चौकशी केल्यास, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनुदान खात्यावर जमा होईल, असे बँक अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. जिल्हा बँक ताब्यात, तरीही राष्ट्रवादीचे निवेदन बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी तासगाव बंद ठेवण्यात आले होते. त्यामध्ये खरीप हंगामासाठी शासनाकडून आलेली भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करावी, या मागणीचाही समावेश आहे. मात्र प्रशासनाकडून जिल्हा बँकेच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले असून, बँकेकडूनच अनुदान अद्याप मिळालेले नाही. तरीही राष्ट्रवादीनेच याबाबत निवेदन दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनुदानावर एक नजर... तासगाव तालुक्यात कोरडवाहू शेतकरी लाभार्थ्यांची संख्या ६१ हजार १४५ इतकी आहे. खरीप अनुदानासाठी प्रशासनाकडून ३२ कोटी ८० लाख २८ हजार ३३० रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात शासनाकडून १८ कोटी ३३ लाख ४१ हजार ४०५ रुपये प्राप्त झाले. मिळालेला निधी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना मंजूर अनुदानाच्या ६० टक्के इतका वर्ग करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात ५ कोटी ७६ लाख रुपयांचे अनुदान प्रशासनाकडे प्राप्त झाले असून, लवकरच १७ टक्क्यांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार आहे.तासगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या पूर्व भागात भीषण दुष्काळ आहे. पावसाअभावी शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान तातडीने मिळाले, तर दिलासा मिळणार आहे. मात्र प्रशासनाकडून अनुदान वर्ग करूनही बँकेकडून स्वार्थी हेतूने टाळाटाळ केली जात आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे.- महेश खराडे, प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
तासगावातील शेतकऱ्यांच्या अनुदानाला कासवगती
By admin | Published: March 17, 2016 12:11 AM