लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : महाराष्ट्र शासनाने घोषणा करूनही नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले नाही, ते तातडीने द्यावे त्याचप्रमाणे दोन लाखांवरील कर्जमाफी लवकर द्यावी, अशी मागणी कसबे डिग्रज सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आनंदराव नलवडे यांनी केली. या सभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला.
जिल्ह्यात प्रथमच या सोसायटीची ऑनलाईन सर्वसाधारण सभा अध्यक्ष प्रा. बाळासाहेब मासुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मासुले म्हणाले, महापूर आणि कोविडच्या काळातही सोसायटीने गतिमान कारभार करून २८ लाख सहा हजार रुपये नफा मिळवला. १० टक्केप्रमाणे सुमारे २१ लाख रुपयांचा लाभांश दिला आहे. महापुराने १४ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्यापैकी १० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली तर ८९९ सभासदांना सुमारे सहा कोटी रुपयांची मदत मिळाली. त्यामुळे संस्थेची थकबाकी वसुली झाली. संस्थेला कोविड धान्य वाटप अनुदान दोन लाख २० हजार रुपये मिळाले आहे.
यावेळी सभासदांच्या प्रश्नांना संचालक रमेश काशीद, कुमार लोंढे, वृद्धमान अवधूत, राजाराम चव्हाण यांनी उत्तरे दिली. उपाध्यक्ष वंदना रेगे, संचालक विपुल चौगुले, शिवशांत चव्हाण, भानुदास सलगर आदी यावेळी उपस्थित होते. सचिव संजय साळुंखे यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. अजित आपटे यांनी आभार मानले. ऑनलाईन सभेला अण्णासाहेब सायमोते, अच्युत शिंदे, शरद कांबळे, अरुण हजारे आदी सभासद उपस्थित होते.