खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता
सांगली : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत अहे. महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी खड्डे भरुन घ्यावेत, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.
ग्रामसभेसाठी जनजागृती करणे गरजेचे
सांगली : ग्रामीण भागात ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेला ग्रामस्थ अनेकवेळा पाठ फिरवितात. त्यामुळे गावातील निर्णय त्यांना माहीतच पडत नाहीत. ग्रामीण भागामध्ये ग्रामसभेसाठी जनजागृती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने केली जात आहे.
वजनाच्या नावाखाली दगडांचा वापर
सांगली : ग्राहकांना वस्तू मोजून देणे व वजनानुसार बरोबर पैसे घेणे, ही व्यवहाराची पद्धत आहे. पण पैसे बरोबर देऊनही वजनात तूट निर्माण होण्याच्या प्रकारामुळे ग्राहक लुटले जात आहेत. लहान-मोठ्या विक्रेत्यांकडून सर्रासपणे अशी लूट सुरू असून, वजन म्हणून तेवढ्या वजनाचे दगड दिसून येतात. यात अनेकदा ग्राहकांची फसगत होत आहे.
जातप्रमाणपत्र प्रकरणे प्रलंबित
सांगली : जिल्ह्यातील काही नागरिक मागील ४० ते ५० वर्षांपासून गावामध्ये राहतात; मात्र अद्यापही अनेकांकडे जात प्रमाणपत्र नाही. प्रमाणपत्र मिळावे, यासाठी कागदपत्रांसह अर्ज सादर केले. मात्र, प्रकरणांचा निपटारा वेळेत होत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
प्लास्टिक पिशव्यांना आळा घाला
सांगली : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. शहरातून फिरणारे सरसकट प्लास्टिक पिशव्यांतून साहित्य ग्राहकांना देत आहेत. या पिशव्या कुठेही टाकून देण्याचे प्रकार वाढल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.
एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नियुक्त करावे
सांगली : शहरातील विविध भागांमध्ये बँकांनी एटीएम सेवा सुरू केली आहे. ग्राहक याचा लाभसुद्धा घेत आहे. मात्र काही ठिकाणी एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून येत आहे. भविष्यात काही धोका झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे.
धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावले
सांगली : सांगली ते समडोळी रस्त्यावर महापालिकेचा कचरा डेपो आहे. येथील कचरा पेटविण्यात येत असल्यामुळे धुराचा प्रवाशांना त्रास होत आहे. वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असून, अनेकांना श्वसनाचा आजारही जडला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कचरा पेटविणे बंद करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कवठेपिरानच्या ग्रामस्थांनी दिला आहे.