मिरज : मिरज तालुक्यात अनेक गावांत द्राक्षे खरेदी करून पैसे न देता, व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना सुमारे ५० लाखांचा गंडा घातला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे.अधिक माहिती अशी, मिरजेतील उमर बागवान नामक व्यापाऱ्याने तालुक्यातील सोनी, बेडग, आरग परिसरात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आखाती देशात द्राक्षे पाठवत असल्याचे सांगून, गेली दोन वर्षे द्राक्षे खरेदी केली. सुरुवातील या द्राक्षे खरेदीचे पैसे वेळेवर देत, त्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. मात्र, या वर्षी शेतकऱ्यांनी द्राक्षाचे पैसे मागितल्यानंतर उमर बागवान याने उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच धमकी दिली.याबाबत रामदास नरुटे (रा.मिरज) या शेतकऱ्यांने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नरुटे यांच्या मध्यस्तीने आणखी दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी बागवान याला द्राक्षे विकली असून, त्यांचीही रक्कम मिळालेली नाही. या सर्व शेतकऱ्यांची सुमारे ५० लाखांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी याबाबत चाैकशी सुरू असल्याचे सांगितले.
फसवणुकीचे प्रकार सुरूचप्रत्येक वर्षी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडतात. पोलिस प्रशासनाकडून याबाबत वारंवार बैठका घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते. त्यानंतर, परप्रांतातील व्यापारी, दलाल व काही वेळा स्थानिकांकडून फसवणुकीचे प्रकार घडतात.