- गजानन पाटील, (संख, जि. सांगली)
शेतकऱ्यामध्ये मोठा संशोधक दडलेला असतो. कुंभारी (ता. जत, जि. सांगली) येथील शेतकरी दाजी पाटील यांनी यंत्रसाधने विकसित करीत ऊस लागवडीचे कुंभारी मेड यंत्र तयार केले आहे. हे यंत्र ट्रॅक्टरला सहजपणे जोडता येते. ते ऊस लागवडीची पाच कामे एकाच वेळी करते. सरी सोडणे, खत सोडणे, बियाणे सोडणे, खत व बियाणे मुजवणे, सरीत ठिबक सिंचन पाईप टाकणे ही पाच कामे करते. यातून शेतकऱ्याचा वेळ, श्रम, पैसा याची बचत होते.
दाजी पाटील यांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले आहे. त्यांची वडिलोपार्जित २० एकर जमीन आहे. दहा एकरात ऊस पीक घेतात. ते बालपणापासून विविध साधनांच्या निर्मितीचे प्रयोग करायचे. त्यांनी बनविलेल्या यंत्राने पारंपरिक पध्दतीने ऊस लागवड करता येते. यंत्रावर ऊस कांड्या व खताची साठवणूक करण्याची व्यवस्था केली आहे. दोन्ही बाजूला ठिबकचे बंडल बसविले आहेत. दोन्ही सरीत ठिबक पाईप टाकता येते. या यंत्रावर दोन माणसे बसू शकतील, अशी आसने तयार केली आहेत.
भंगारातील लोखंडी साहित्यातून हे यंत्र तयार केले आहे. पूर्वी या यत्रात काही त्रुटी राहील्या. यंत्रातून उसाची कांडी योग्यरीत्या खाली पडत नव्हती. कधी कांड्यांवर माती अधिक पडली जायची. अशा अडचणींवर मात करीत, त्यात कौशल्यपूर्ण बदल केले आहेत. या यंत्राद्वारे ऊस लागवड केल्यास एकरी खर्च हजार रुपये येतो व दोन तासात काम होते. या यंत्राने लागवड केल्यास ११ हजाराची बचत होते. यंत्र तयार करण्यासाठी ४० हजार रुपये खर्च येतो. नवीन लोखंडी साहित्य घेऊन यंत्र तयार केल्यास ६० हजार रुपये खर्च येतो. यंत्र बनविण्यासाठी त्यांना आई फुलाबाई व पत्नीचीही साथ मिळाली, असे पाटील यांनी सांगितले.