- सहदेव खोत (पुनवत, जि. सांगली)
नाटोली (ता. शिराळा) येथील बबन राजाराम पाटील या शेतकरी व्यावसायिकाने आपल्या वेल्डिंग वर्क्समध्ये सुलभ ऊसभरणी यंत्र बनविले आहे. शेतात तोडणी केलेला ऊस या यंत्राच्या साहाय्याने मनुष्यबळ वाचवून ट्रॅक्टर-ट्रॉलीत भरता येत असल्याने हे यंत्र शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे.
बबन पाटील हे मूळचे शेतकरी असून, सागाव फाट्यावर त्यांचे वेल्डिंग वर्क्स दुकान आहे. ऊसतोडणीच्या हंगामात कामगारांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. ऊसतोडणी व भरणी वेळेत झाली, तर शेतकऱ्याचा ऊस वेळेत कारखान्यापर्यंत पोहोचत असतो. ऊसतोडणीचे यंत्र आले, तसेच ऊसभरणीचे यंत्र विकसित झाले, तर शेतकऱ्यांचे श्रम वाचतील, या उद्देशाने पाटील यांनी परदेशी बनावटीच्या ऊसभरणी यंत्राचा अभ्यास करून सुमारे १,००० किलो वजनाचे हे लोखंडी यंत्र बनविले आहे. हे यंत्र कोणत्याही ट्रॅक्टरला पुढील बाजूस जोडता येते. त्याचा पुढील भाग चिमट्यासारखा असून, ते जेसीबीसारखे काम करते. शेतात तोडून पडलेला ऊस मोळ्या न बांधता या यंत्राने उचलून ट्रॉलीत भरता येतो. हे काम ट्रॅक्टरचालक एकटा करतो.
हे यंत्र चोहोबाजूला फिरणारे आहे. त्यामुळे आपल्याला हवा तसा ऊस भरता येतो. येथे कामगार व वेळेची बचत होते. हे यंत्र तयार करण्यासाठी पाटील यांना अडीच लाख रुपये खर्च आला आहे. हे यंत्र वापरणाऱ्या शेतकऱ्याला टनामागे भरणीचे पैसे मिळतात. या यंत्राला पुरेशी लाईटव्यवस्था जोडलेली असल्याने रात्रीही ते काम करू शकते. ट्रॅक्टरला हवे तेव्हा जोडता येते व सोडवताही येते. यंत्र तयार करण्यासाठी त्यांना एक महिना लागला आहे. यंत्र तयार झाल्यानंतर त्यांनी त्याची चाचणी घेतली असून, ते यशस्वीरीत्या काम करीत आहे.