अग्रण धुळगावमध्ये एक फौजी एक झाड या संकल्पनेतून संपूर्ण गाव हरितग्राम करण्यात आले आहे.
संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर उमेदीचे आयुष्य घालविणाऱ्या व प्रसंगी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती प्रत्येकजण आपापल्या परीने आदर व्यक्त करत असतो. कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आदर सर्वांसाठीच आदर्शवत ठरावा असाच आहे. प्रत्येक सैनिकाच्या नावे ग्रामस्थांनी एकेक झाड लावले आहे. त्यावर सैनिकाचे छायाचित्र लाऊन त्याच्या देशसेवेला सलाम केला आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात अग्रणी फाउंडेशनने नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मोठे कार्य केले. हा प्रकल्प यशस्वी होतानाच हरितग्रामचा विडा उचलला. त्याला भावनिक जोड देताना एक गाव एक फौजी उपक्रमाचा संकल्प केला. आज धुळगावच्या नदीकाठाला, शाळा व स्टेशन परिसरात नजर ठरणार नाही इतपत हिरवळ फुलली आहे.
अवघा कवठेमहांकाळ तालुका म्हणजे सैनिकांचा परिसर. प्रत्येक गावातला एक तरी तरुण देशसेवेसाठी गेलेला. धुळगावमध्ये तर आजी-माजी अशा तब्बल २ हजार ८०० सैनिकांची गाैरवशाली परंपरा. निवृत्तीनंतर गावी आलेल्या प्रत्येक जवानाला पाणीटंचाईची समस्या भेडसावायची. अनेकांनी पाणीटंचाईला कंटाळून सांगली, मिरज, पुणे, कवठेमहांकाळ शहरे जवळ केली. हे लक्षात घेऊन २०१२ मध्ये वृक्षारोपणाची संकल्पना पुढे आली. २०१६ पासून तिला गती आली. आजमितीला ३ हजार ४०० झाडे गावाभोवती लावली आहेत. अग्रणी नदीसह यल्लम्मा मंदिर, हायस्कूल, मिरज-पंढरपूर लोहमार्ग, बसस्थानक आदी परिसरातील झाडे हरितग्रामची साक्ष देताहेत. त्यातील दीडशेहून अधिक झाडे सैनिकांच्या नावे आहेत. प्रत्येक झाडावर सैनिकाचा फोटो, नाव लावले आहे. भविष्यात त्यावर सैनिकाचा हुद्दा, नेमणुकीचे ठिकाण, त्याला मिळालेले पुरस्कार, आदी माहितीही नोंदविण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी अग्रणी फाउंडेशनचे शिवदास भोसले यांच्यासह गजानन सुतार, सुरेश सुतार, विशाल देशमुख, हेमंत खंडागळे, अतुल शेषवरे, दिगंबर काटकर, गोविंदराव भोसले, चंद्रकांत भोसले, सागर कनप, कमलाकर देशमुख, राहुल भोसले, विठ्ठल भिसे, प्रवीण शेषवरे, रमेश खंडागळे, राजेंद्र हजारे, आदी परिश्रम घेत आहेत.
चौकट
लेकीचे झाड
गावातून विवाहानंतर सासरी जाणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावेदेखील लेकीचे झाड संकल्पना राबविली आहे. त्यावर लेकीचा फोटो लावला आहे. भविष्यात माझे झाड ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
------------