गव्हाण : राज्यात पानी फौंडेशनच्यावतीने वॉटर कप स्पर्धा आयोजित केली असून चालूवर्षी तासगाव तालुक्यातील अनेक गावांनी यात सहभाग घेतला आहे. तासगाव तालुक्यातील गव्हाणनेही गाव पाणीदार करण्याचा निर्धार केला आहे.
गावातील मोजक्याच तरुणांनी सुरुवातीला मोठ्या जिद्दीने आठ एप्रिलपासून दररोज सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत तीन तास हातात टिकाव, खोरे, पाटी घेऊन ऐन वैशाख वणव्यात माळावर खोदकाम करून माळरान पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी गावापुढे एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या जिद्दीने प्रेरित होऊन गावात सुरू असलेल्या उन्हाळी क्रीडा शिबिरातील १२० मुला-मुलींनी मोठा सहभाग नोंदवत गावातील पानी फौंडेशनच्या कामाला मोठी गती दिली आहे.
तरुणांचा प्रतिसाद पाहून गावातील राजकीय पक्षांनी गट-तट विसरून श्रमदानात भाग घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातून गावात पहिल्यांदाच अबाल-वृद्धापासून ते महिलापर्यंत सारेच गाव पाणीदार करण्यासाठी कार्यरत आहेत.
गाव पाणीदार करण्यासाठी गावातील शरद पवार, युवराज सरवदे, लालासाहेब पाटील, सचिन पाटील, योगेश घाळे, सागर पवार, शुभम पवार अथक् परिश्रम करीत आहेत. यावेळी मास्टर सोशल ट्रेनर ज्योती सुर्वे, अमिता चौहान, भावना बाबर, कोमल यादव, अमोल जाधव, प्रशांत गोडबोले, विनोद गोसावी, कमलेश शिंदे, प्रियेश पाटील, मनोज पाटील, अतुल यादव यांनी गव्हाणमध्ये भेट देऊन श्रमदान केले.लहान मुलांचा सहभागवास्तविक विचार केला, तर सध्या मे महिना सुरू असतानाही उन्हाचा त्रास न पाहता लहान मुला-मुलींचा यात सहभाग मोठा आहे. सध्याच्या परिस्थितीत गावात एकमेकांची जिरवण्यापेक्षा गावातील गट-तट विसरून गावाचं पाणी गावातल्या शिवारातच जिरवायचा जणू चंगच तरुणांनी बांधला आहे.