कुपवाड : येथील औद्योगिक वसाहतीमधील समृद्धी व्हॅल्यू मार्केटिंग या कंपनीला बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास फटाक्याची ठिणगी उडून आग लागली. सुप्रसिद्ध समृद्धी इंडस्ट्रीजची ती विपणन कंपनी आहे. आगीत शेड, भांडी, चटई आणि सोफी मॅट अशी उत्पादने जळून खाक झाली असून, सुमारे दोन कोटींचे नुकसान झाले. कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये प्लास्टिकच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या समृद्धी इंडस्ट्रीज कंपनीचे कार्यालय आणि कारखाना आहे. तेथील उत्पादनांच्या घाऊक विक्रीसाठी समृद्धी व्हॅल्यू मार्केटिंग ही त्यांचीच विपणन कंपनी कार्यरत आहे. तेथील शेडवजा गोदामात चटई, स्टीलची भांडी, सोफी मॅट ही उत्पादने ठेवली होती. सध्या दीपावलीनिमित्त कामगारांना सुटी असल्याने गोदाम बंद होते. मात्र, बुधवारी लक्ष्मी पूजनानिमित्त ते उघडले जाणार होते. तथापि, पूजेपूर्वीच आग लागली. सकाळी लक्ष्मी पूजनानिमित्त शेजारच्या कारखान्यातील कामगारांनी फटाक्यांची आतषबाजी केली. त्या फटाक्यांची ठिणगी ‘समृद्धी’च्या शेडवजा गोदामामध्ये पडून सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच जवळच्या कामगारांनीकुपवाड पोलीस ठाणे व एमआयडीसीच्या अग्निशमन केंद्राला दूरध्वनीवरून माहिती दिली. दरम्यान, एमआयडीसीच्या गाड्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. दोन ते अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले. तासगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागानेही यावेळी मदत केली. मात्र, सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्पर सेवा दिली नसल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्यांनी आग आटोक्यात आणली. आगीमध्ये बाहेरील शेड, त्यातील रॅक, चटई, स्टीलची भांडी, सोफी मॅट, आदी उत्पादने जळून खाक झाली. यामध्ये सुमारे दोन कोटींचे नुकसान झाले. ‘समृद्धी’चे मालक ओमप्रकाश मालू, रमाकांत मालू, प्रमोद मालू, विपणन विभागाचे उपाध्यक्ष अमितकुमार चव्हाण यांच्यासह ‘कृष्णा व्हॅली चेंबर’चे अध्यक्ष सतीश मालू, शिवाजी पाटील, रमेश आरवाडे, अनंत चिमड यांनी घटनास्थळी भेट दिली. कामगारांनीही शर्थीचे प्रयत्न करून काही उत्पादने आगीतून बाहेर काढली.अन् अनर्थ टळला...शेजारीच बसवेश्वर कोल्ड स्टोअरेज आहे. त्या कोल्ड स्टोअरेजच्या बाजूला आगीचे लोळ येत होते. तेथे गॅसच्या टाक्याही होत्या; मात्र अग्निशमन विभागाने आग लवकर आटोक्यात आणल्यामुळे या कोल्ड स्टोअरेजला धोका पोहोचू शकला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.कुपवाड एमआयडीसीमध्ये सुमारे सातशेहून अधिक उद्योग आहेत. लगतच आणखी एक एमआयडीसी व औद्योगिक वसाहतीही कार्यरत आहेत. या उद्योगांना संरक्षण देण्यासाठी एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाला आणखी एका अत्याधुनिक अग्निशमन गाडीची गरज आहे. महामंडळाने त्वरित अत्याधुनिक गाडी द्यावी. - सतीश मालू, अध्यक्ष, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स, एमआयडीसी कुपवाड.दुचाकीचा स्फोट आणि पळापळआगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर एका कामगाराची दुचाकीही जळून खाक झाली. या दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट सिलिंडर टाकीचा झाला असावा, या शंकेने आग पाहण्यासाठी आलेल्या बघ्यांची एकच पळापळ झाली. काहींनी कारखान्याच्या कुंपणावरून उड्या मारून पळ काढल्याने गोंधळ उडाला.
कुपवाडमध्ये ‘समृद्धी मार्केटिंग’ला भीषण आग
By admin | Published: November 12, 2015 12:24 AM