सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरनंतर सांगलीतील महापुराचा आढावा घेतला. फडणवीस यांनी हिराबाग येथील रेस्क्यू ऑपरेशनची पाहणी करून कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती पत्रकारांसमोर मांडली. तसेच, पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस नदीच्या पुरानंतर तब्बल पाच दिवसांनी आज सांगलीत पोहोचले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप का आले नव्हते, गेली 5 दिवस त्यांना सांगली दिसली नाही का? असा प्रश्न उपस्थित करत सांगलीतील काही स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणा देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले नाही. कोल्हापूर आणि सांगलीकरांना शक्य तितकी मदत सर्वसामान्यही करत आहेत. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. महापुराने अस्मानी संकट ओढावल्याने सांगली जिल्ह्याची परिस्थिती अतिगंभीर झाली आहे. मात्र, राज्यभरातून मदतीचाही पूर या दोन जिल्ह्यात येत आहे. तसेच, राज्य सरकारनेही 154 कोटी रुपयांची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली असून पीडित नागरिकांना रोखीने पैसे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगलीतील नागरिक आणि पत्रकारांच्या प्रश्नाचा सामना करावा लागला. विरोधकांच्या टीकेवरुनही पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला त्यावर बोलताना, कुणीही पूरस्थितीचं राजकारण करु नये, असे फडणवीस यांनी म्हटले. मला, हेलिकॉप्टरने येण्यास परवानगी नसल्यामुळे मी उशिरा आलो. तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन आले होते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगतिले. तसेच, महाजन यांनी सेल्फी घेतला नसून स्थानिकांचा निरोप घेतना त्यांनी हातवारे केले होते. तर, महाजन यांनी स्वत: कुठलाही सेल्फी घेतला नसल्याचे फडणवीस म्हणाले.
पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाचं काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी सरकार पूर्ण क्षमतेने मदत आणि पुनर्वसनाचं काम करेल. मात्र, देवस्थान, सामाजिक संस्था आणि दानशूर नागरिकांनीही मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. तसेच, पुराचे पाणी ओसरल्यानंतर रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने 100 डॉक्टरांची टीम कोल्हापूर आणि सांगली येथे पाठविण्यात येईल. नागरिकांना अन्न, पाणी आणि इतर महत्वाचं सामान पुरविण्यात येईल, असेही फडणवीस यांनी म्हटले.