सांगली : दानोळी (ता. शिरोळ) येथील ब्रेन डेड झालेल्या वृद्ध महिलेच्या अवयवदानाचा महत्त्वपूर्ण निर्णय डॉक्टर, नातेवाईकांनी घेतला आणि वैद्यकीय पथकासह पोलीस यंत्रणा कामाला लागली. अवयवांपैकी सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे यकृत पुण्याला, तर मूत्रपिंड कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले. या दोन्ही मार्गावर वाहतुकीचा अडथळा नको म्हणून पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केले. यामुळे सांगली ते पुणे हे २५० किलोमीटरचे अंतर मंगळवारी केवळ तीन तासांत पार करून यकृत रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यात आले.दानोळी येथील ललिता सातगोंडा पाटील (वय ६०) या महिलेच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांना मिरजेतील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
शस्त्रक्रियेनंतर त्यांचा मेंदू मृत झाल्याचे लक्षात आले. याची कल्पना त्यांची दोन्ही मुले व नातेवाईकांना डॉक्टरांनी दिली. मुलांसह नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. अवयवदानाची प्रक्रिया खासगी रुग्णालयामध्ये करणे शक्य नसल्याने त्यांनी भारती हॉस्पिटलशी संपर्क साधला. भारती हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजी विभागाचे डॉ. बिपीन मुंजाप्पा व डॉ. अमित गाडवे यांनी शस्त्रक्रियेची सर्व तयारी करून घेतली. यकृत, दोन्ही मूत्रपिंड, डोळे, त्वचा यशस्वीरित्या शरीरापासून विलग करण्याची प्रक्रिया पार पडली.
दरम्यानच्या काळात पोलिसांशी संपर्क साधून ग्रीन कॉरिडॉरसाठी प्रयत्न झाले. पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी तातडीने वाहतूक पोलीस विभागाचे सहायक निरीक्षक अतुल निकम, उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्याशी संपर्क साधून सूचना दिल्या. अधीक्षक शर्मा यांनी क-हाड, सातारा, पुणे पोलीस कार्यालयांशी संपर्क साधून पुण्यापर्यंत कॉरिडॉरची व्यवस्था केली.
उपअधीक्षक वीरकर, निरीक्षक निकम यांनी सकाळपासून ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. भारती हॉस्पिटलपासून शहरातील चौका-चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास भारती हॉस्पिटलमधून यकृत घेऊन पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाची रुग्णवाहिका (एमएच १४ जीएच ५२७९) निघाली. त्यापुढे पोलिसांची पायलट गाडी, त्यामागे खासगी वाहन, नंतर रुग्णवाहिका होती. त्याचवेळेस आणखी एक रुग्णवाहिका दोन्ही मूत्रपिंड घेऊन कोल्हापूरसाठी रवाना झाली. तिलाही पायलट गाडी देण्यात आली होती. दोन्ही रुग्णवाहिका सांगलीतून अवघ्या दहा मिनिटांत शहराबाहेर गेल्या.
- सांगलीत प्रथमच कॉरिडॉर
सांगलीत प्रथमच अवयव प्रत्यारोपणासाठी कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. सकाळपासून रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. वाहनधारकांना रस्ता रिकामा ठेवण्यासाठी सूचना दिल्या जात होत्या. उपअधीक्षक अशोक वीरकर, निरीक्षक अतुल निकम कर्मवीर चौकात थांबून संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवून होते. नेमके काय घडत आहे, हे सुरुवातीला वाहनधारकांनाही कळले नाही. पण जेव्हा कॉरिडॉरची माहिती मिळाली, तेव्हा वाहनधारकांनी सहकार्य केले.
- रुग्णवाहिका ५० मिनिटात जिल्'ाबाहेर
पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी क-हाड, सातारा व पुणे पोलिसांशी संपर्क साधला होता. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील टोलनाक्यावर एक लेन रुग्णवाहिकेसाठी खुली ठेवण्याच्या सूचनाही केल्या होत्या. सांगली पोलिसांची गाडी क-हाडपर्यंत, तेथून सातारा पोलिसांची गाडी आणि पुणे पोलिसांची गाडी पायलट म्हणून कार्यरत होती. सांगलीतून कासेगाव ते जिल्हा हद्दीपर्यंतचे ६५ ते ७० किलोमीटरचे अंतर रुग्णवाहिकेने अवघ्या ५० मिनिटात पूर्ण केले. त्यानंतर रुग्णवाहिका क-हाड, साताराच्या दिशेने गेली.सांगली ते पुणे कॉरिडॉर करून एका रुग्णाला जीवदान देण्यासाठी पोलीस व रुग्णालय प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन आहे. जिल्'ातील पहिली आणि दुर्मिळ घटना डॉक्टरांनी यशस्वीरित्या हाताळली. अवयवदान करण्यासाठी भारती हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.- आ. विश्वजित कदमअवयवरूपी स्मृती कायमआईचा मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पहिल्यांदा काहीच सुचले नाही. नातेवाईक व डॉक्टरांशी चर्चा करून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. तिच्या अवयवदाचा आठ ते दहा रुग्णांना फायदा होईल. त्यातूनच ती कायमस्वरुपी आमच्या स्मृतीत राहील. त्यामध्येच आईचे दर्शन झाले. हीच खरी श्रद्धांजली असल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले.