तासगाव : तासगाव तालुक्यात योगेवाडी-मणेराजुरी मिनी एमआयडीसीमध्ये प्रदूषणविरहीत ‘ग्रीन इंडस्ट्री’ उभी करणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव यांनी दिली.तासगाव तहसील कार्यालयात बुधवारी आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत त्या बाेलत हाेत्या. यावेळी एमआयडीसीत प्रदूषण निर्माण करणाऱ्या उद्योगाला परवाना देणार नसल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी डाॅ. गजानन खडकीकर यांनी दिली.दरम्यान शासकीय जागेवर एमआयडीसी उभी करायला आमचा कोणताही विरोध नाही. परंतु खासगी जागेवर एमआयडीसी उभी करू देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. आमच्या खासगी जमिनीच्या सातबारावर असलेले ‘एमआयडीसी’चे शिक्के काढून टाका, अशी मागणी बैठकीत शेतकऱ्यांनी केली.तहसीलदार रवींद्र रांजणे, कार्यकारी अभियंता सुधाकर गांधीले, प्रमुख भूमापक पवन बोबडे, सहायक क्षेत्र व्यवस्थापक जयवंत वावरे, एमआयडीसीचे सहायक अभियंता प्रभाकर गवळी, मंडल अधिकारी राजश्री सानप, तलाठी शिवाजी चव्हाण, योगेवाडीच्या सरपंच दीपाली माने, राजेश माने, शशिकांत जमदाडे, शैलेश शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.जाधव म्हणाल्या, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी आहे. तेथील तरुणांना तालुक्यातच स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होतो. पण तासगाव हा एकमेव तालुका आहे जेथे एमआयडीसी नाही.तहसीलदार रांजणे यांनी खासगी जागेवर कोणत्याही शेतकऱ्यांच्या इच्छेविरोधात उद्योगांची उभारणी केली जाणार नाही, अशी ग्वाही दिली. एवढ्या आश्वासनावर समाधान न झालेल्या शेतकऱ्यांनी खासगी जागेवरील एमआयडीसीचे शिक्के उठवा, अशी मागणी केली. यानंतर तसे अर्ज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशासनाकडे सादर करावेत, असे आवाहन रांजणे यांनी केले.धुराडे असलेल्या उद्याेगास परवाना नाहीएमआयडीसी सुरू झाल्यानंतर होणाऱ्या प्रदूषणामुळे द्राक्षबागांवर गंभीर परिणाम होईल, अशी शंका उपस्थित झाली. यावर डॉ. गजानन खडकीकर म्हणाले, ज्या उद्योगामुळे प्रदूषण होईल, तसेच सांडपाणी निर्माण होईल, अशा कोणत्याही उद्योगास या ठिकाणी परवाना दिला जाणार नाही. ज्या कंपनीला धुराडे असेल त्या कंपनीला येथे परवाना न देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला.
सांगलीतील योगेवाडी-मणेराजुरीच्या माळावर ग्रीन इंडस्ट्री उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 6:29 PM