सांगली : शहरातील अतिथीगृह व जयश्री चित्रमंदिराच्या जागेत बीओटी अथवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तून व्यापारी संकुल उभारण्यास सत्ताधारी गटाचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांनी हिरवा कंदील दाखविल्याची माहिती महापौर विवेक कांबळे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. लवकरच विशेष सभा घेऊन त्यावर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेच्या अतिथीगृहाची इमारत धोकादायक बनली आहे. या इमारतीत जन्म-मृत्यू कार्यालयासह काही विभागाचे कामकाज चालते. इमारतीत सहा दुकानगाळेही आहेत. महापौर विवेक कांबळे यांनी ही इमारत धोकादायक बनल्याने ती पाडून त्याजागी व्यापारी संकुल उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. सत्ताधारी काँग्रेससह विरोधी पक्षातील नगरसेवकांनी तसे पत्र प्रशासनाला दिले होते. अतिथीगृहाजवळच सावित्रीबाई फुले प्रसुतीगृह आहे. प्रसुतीगृहाची इमारत पाडली जाणार आहे. तशी चर्चा सत्ताधारी व प्रशासकीय स्तरावर झाली आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिटही केले आहे. या अहवालात इमारत धोकादायक बनल्याचे म्हटले आहे. या दोन्ही इमारती पाडून त्याजागी बीओटीतून व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव होता; पण आता बीओटीऐवजी पीपीपीतून संकुल उभारला जाणार असल्याचे महापौरांकडून स्पष्ट केले जात आहे. या दोन्ही इमारतीसह हरभट रस्त्यावरील जयश्री टॉकीजजवळील पार्किंगच्या जागेतही संकुल उभारण्याचा विचार सुरू आहे. पण तेथील गाळेधारकांशी अद्याप चर्चा झालेली नाही. पालिकेतील एका ज्येष्ठ नगरसेवकांवर चर्चेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरापासून विशेष सभेत व्यापारी संकुलाला मंजुरी घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. पण मदन पाटील यांचा ग्रीन सिग्नल मिळत नव्हता. अखेर त्यांनीही हिरवा कंदील दाखविल्याचे सांगितले जात आहे. त्याला महापौरांनीही दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)विशेष सभा शक्य---आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विशेष सभा घेऊन व्यापारी संकुल उभारण्याचा विषय चर्चेला घेतला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सांगलीतील व्यापारी संकुलास मदनभाऊंनी दिला ‘ग्रीन सिग्नल’
By admin | Published: October 14, 2015 11:14 PM