इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरात सोमवारी रात्री आठपासून साडेनऊपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाने तुफान हजेरी लावली. यामुळे उरुण परिसरातील खेड रस्त्यावरील चार ते पाच ग्रीन हाउसची पडझड झाली. यामध्ये अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. तत्काळ दुरुस्ती झाली नाही, तर येथील तयार जरबेरा फुलांचे मोठे नुकसान होणार आहे.
उरुण परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात १० गुंठ्यापासून २५ गुंठ्यापर्यंत ग्रीनहाउस उभे केले आहेत. या शेतकऱ्यांनी जरबेरा फुलांचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. महादेव गणपती पाटील यांनी १५ गुंठे क्षेत्रात ग्रीनहाउस उभे केले आहे. याला अंदाजे २५ लाख रुपये खर्च आला आहे. लॉकडाऊनमुळे फुलांना मागणी नाही. मुंबई येथील मार्केटला सध्या प्रति फूल दोन रुपये दर सुरू आहे. त्यातच वादळी पावसाने ग्रीनहाउसचे सर्व छत उडून गेले. त्यामुळे पाटील यांचे अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. तत्काळ छताचे काम पूर्ण झाले नाही, तर जरबेरा फुलांचे नुकसान होणार आहे.
याच परिसरातील शेतकरी महेश संपतराव मोरे यांचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. रघुनाथ ज्ञानू खांबे यांचेही दोन लाखांचे नुकसान झाले. यासह परिसरातील काही फॉर्महाउसचेही माेठे नुकसान झाले आहे. अगोदरच कोरोनाचे सावट असल्याने, फुलांना बाजारपेठ नाही त्यातच वादळी पावसाचे अस्मानी संकट या शेतकऱ्यांवर आले आहे.
फोटो : २७ इस्लामपुर १
ओळी : इस्लामपूर खेड रस्त्यावर असलेल्या महादेव पाटील यांच्या फॉर्महाउसचे छप्पर उडून गेले आहे.