इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. येथील तहसील कचेरीजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता.
नगरपालिकेच्या वतीने उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या नगरसेविका मनीषा पाटील यांनी कार्यकर्त्यांसह पुतळा परिसरात येऊन अभिवादन केले. वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. दिलीप सावंत, शाकीर तांबोळी, डॉ. क्रांती सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.
विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार, कोमल बनसोडे, रिपाइंचे शहराध्यक्ष अमर बनसोडे यांनीही पुतळा परिसरात येऊन अभिवादन केले. शहरातील सामाजिक आणि परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. मिलिंद खंडेलोटे, प्रा. पी. एच. पाटील, प्रा. सी. जे. भारसकळे, ग्रंथपाल विजय तिबिले, जगन्नाथ नांगरे, प्रकाश संकपाळ उपस्थित होते.
दीनदयाळ सूतगिरणीच्या कार्यस्थळावर कार्यकारी संचालक अॅड. चिमण डांगे यांच्या हस्ते प्रतिमा पूूजन करण्यात आले. यावेळी अॅड. संपतराव पाटील, राजेंद्र लोंढे, मंगेश लवटे, बजरंग कदम, रमेश पाटील, प्रशांत जाधव उपस्थित होते. आरआयटीमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रम झाले. अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान सर्वांचे जीवन समृद्ध करणारे आहे. प्राचार्य डॉ. सुषमा कुलकर्णी अध्यक्षस्थानी होत्या. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी स्वागत केले.