लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी संघटनांच्या पुढाकाराने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून वाॅकला सुरुवात झाली. ‘फुले-शाहू-आंबेडकर.. आम्ही सारे दाभोलकर’ ‘विवेकाचा आवाज बुलंद करू’, ‘लढेंगे जितेंगे’ अशा घोषणा देत फेरी निघाली. महात्मा गांधी पुतळ्याजवळ समारोप झाला.
माजी आमदार प्रा. शरद पाटील म्हणाले, डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासातील दिरंगाई पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. दाभोलकरांनी आयुष्यभर विवेकी विचारांचा प्रचार केला, शांततेच्या अहिंसक मार्गाने लढे दिले. अशा माणसाचा भरदिवसा खून होतो आणि खूनी, सूत्रधार अद्याप सापडत नाहीत याचा आम्ही निषेध करतो.
ॲड. के. डी. शिंदे म्हणाले, देवाधर्माच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीविरुद्ध दाभोलकरांनी काम केले. त्यांच्या पश्चात विवेकवादी चळवळ वाढविणे हीच खरी आदरांजली ठरेल.
अंनिसचे संजय बनसोडे म्हणाले, राजकीय शक्तीच्या अभावामुळे दाभोलकरांचे खुनी पकडले जात नाहीत. त्यांचा विचार अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी विकास मगदूम, जनार्दन गोंधळी, चंद्रकांत शिंदे, डॉ. प्रदीप पाटील, शंकर शेलार, डॉ. संजय निटवे, ॲड. भारत शिंदे, उज्ज्वला परांजपे, डॉ. संजय पाटील, योगेश कुदळे आदी उपस्थित होते. पद्मजा मगदूम, शुभांगी चव्हाण, जितेंद्र भिलवडीकर, मुनीर मुल्ला, चंद्रकांत वंजाळे, प्रा. बी. आर. जाधव आदींनी संयोजन केले.