कुपवाड : सांगली, मिरजेच्या मानाने अद्यापही अविकसित असलेल्या कुपवाड शहरातील उपनगरांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुंठेवारी क्षेत्रामधील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनाबरोबरच नगरसेवकांकडून सतत होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दलदल झालेल्या भागातील रस्त्यावर प्रशासनाने त्वरित मुरूम टाकण्याची मागणी होत आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि महापालिकेची स्थित्यंतरे अनुभवलेल्या कुपवाड शहराची अवस्था अजूनही खेड्यासारखीच आहे. महापालिकेची स्थापना होऊन सोळा वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. तरीही अजून या शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. सांगली, मिरजेच्या मानाने या शहरात कमी विकास पाहावयास मिळतो. कुपवाडच्या नगरसेवकांमध्ये एकी नसल्याचा फटका प्रामुख्याने या शहराला बसला आहे. त्यामुळेच अजून कुपवाड शहरासह उपनगरांचा विकास झालेला नाही, असे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. सांगली, मिरजेपेक्षा सध्या कुपवाडमध्ये गुंठेवारीचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. या भागात गोरगरीब नागरिकांनी आपल्या कुवतीनुसार कमी पैशामध्ये जागा घेऊन गुंठेवारी क्षेत्रात घरे बांधली आहेत. पण त्याठिकाणी अजूनही महापालिकेच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. याठिकाणी रस्त्याची कमतरता आहे. तसेच गटारी नाहीत. आरोग्य विभागाच्या सुविधाही मिळत नाहीत. तरीही नागरिक प्रामाणिकपणे कर भरत असून कर भरण्यातही कुपवाड शहरातील नागरिक आघाडीवर आहेत. शहरातील व्यापारी संघटना, कुपवाड संघर्ष समिती, राष्ट्रवादी, भाजप आदी पक्षांनी शहरातील सुविधांसाठी आंदोलने केली आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून कायमच या शहराकडे दुर्लक्ष केले जात आहे. कुपवाड शहरात वाघमोडेनगर, श्रीमंती कॉलनी, साईनगर, रामकृष्णनगर, ढवळेश्वर कॉलनी, प्रकाशनगर, ढालाईतनगर, गंगानगर, वारणालीतील दुर्लक्षित भाग, शिवशक्तीनगर आदी भागातील गुंठेवारी क्षेत्रात सध्या रस्ते नसल्याने सततच्या पावसामुळे चिखल होऊन व साठलेल्या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नागरिकांना चिखलातून मार्ग काढणे अवघड होऊ लागले आहे. मोठ्या प्रमाणात दलदल झाल्याने नागरिकांची दैना उडाली आहे. मुरूम टाकल्यास रस्त्यावर झालेली दलदल कमी होऊन नागरिकांना येणे-जाणे सोयीचे होईल, त्यामुळे महापालिकेने या भागात पावसाळी मुरूमाची लवकरात लवकर सोय करावी, अशी मागणीही नागरिकांतून होऊ लागली आहे. (वार्ताहर)
कुपवाड परिसरातील गुंठेवारीत उडाली दैना
By admin | Published: July 14, 2016 12:12 AM