सांगली : जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तुटण्यासाठी बुधवार रात्री आठपासून आठ दिवसांसाठी पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, कृषी सेवा केंद्र, बेकरी, बाजार समित्या पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, रुग्णसंख्या कमी करण्यासाठी काेरोनाची साखळी तोडणे खूपच महत्त्वाचे आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार आता बुधवारी रात्री आठपासून ते १३ मे रोजी सकाळी सातपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे.
यापूर्वी लागू असलेल्या कडक निर्बंधांमध्ये किराणा दुकाने, बेकरी, कृषी सेवा केंद्र सकाळी ११ पर्यंत सुरू राहण्यास परवानगी होती. मात्र, आता ही सर्व दुकाने बंद राहतील. सध्या हॉटेल, उपाहारगृहे, बार या सेवा बंद असल्या तरी त्यांना पार्सल देण्याची परवानगी होती. आता पुढील आठ दिवसांसाठी ही सेवाही बंद राहणार आहे.
निर्बंध कालावधीत रस्त्याकडेला असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आणि मटण, चिकन, अंडी, मासे विक्रीलाही परवानगी होती. आता हे सर्व व्यवसाय बंद राहणार आहेत.
बससेवा पूर्ण बंद राहणार असून अत्यावश्यक कारणांसाठीच रिक्षा वापरता येईल. खासगी बसने जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर १४ दिवस होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा शिक्का मारण्यात येणार आहे. खासगी बस कंपनीने हा शिक्का मारण्याचे काम करावयाचे आहे.
जिल्ह्यातील सुरू असलेल्या उद्योगांबाबतही निर्णय घेण्यात आला असून कोरोनाविषयक उपाययोजना केलेल्या उद्योगांना व आवश्यक सेवा असणाऱ्या उद्योगांना परवानगी असेल तर इतर उद्योग लॉकडाऊन कालावधीत बंद राहणार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चौकट
या सेवा सुरू राहणार
रुग्णालये, औषध दुकाने, दूध विक्री केंद्र (सकाळी ७ ते ९), शिवभोजन थाळी योजना, शीतगृहे, बँकिंग सेवा, वस्तूंची वाहतूक, पेट्रोल व डिझेल विक्री (फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच), माल वाहतूक, गॅसपुरवठा
चौकट
या सेवा पूर्ण बंद राहणार
सर्व किराणा दुकाने, कृषी सेवा केंद्र, उपाहारगृह, हॉटेलमधील पार्सल सुविधा, वाइन शॉप, बीअर शॉपी, दारू दुकाने, सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, मटण, चिकन, अंडी विक्री, खाद्यपदार्थ विक्रेते, किरकोळ भाजी विक्री