लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील श्री पद्मप्रभ नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्चअखेर ८२ लाख रुपये ढोबळ नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कुमार वाडकर व उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली.
वाडकर म्हणाले, श्री पद्मप्रभ नागरी सहकारी पतसंस्थेने सभासद व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. महापूर, कोरोना संकट सुरू असतानाही ३१ मार्चअखेर संस्थेची ९८.८० टक्के कर्जवसुली झाली आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी २२ लाख, ठेवी २५ कोटी ८५ लाख, कर्ज वाटप १९ कोटी ६१ लाख, गुंतवणूक ९ कोटी ५३ लाख आहे. नेट एनपीए शून्य टक्के आहे. मार्चअखेर ८२ लाख रुपये नफा झाला असून ऑडिट वर्ग सतत 'अ' आहे.
संस्थेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयींनीयुक्त भव्य व प्रशस्त इमारत खरेदी केली आहे. संस्थेचे कामकाज नूतन इमारतीत जोमाने सुरू आहे. संस्थेने ग्राहकांना सेफ डिपॉझिट लॉकर्सची सोय उपलब्ध करून दिली आहे. सभासदांना १३ टक्के लाभांश दिला आहे. सांगली जिल्ह्यात प्रथमच संस्थेच्यावतीने ग्राहकांसाठी एटीएम सेवा सुरू करण्यात येत आहे. संस्थेच्या सर्व शाखांचे कामकाज सीबीएस प्रणालीसह अद्ययावत असून आरटीजीएस, एनईएफटी तसेच एसएमएस या सुविधांबरोबरच सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारची वीजबिले रोखीने व धनादेशाने स्वीकारण्यात येत आहेत.
संस्थेचे सचिव सुनील कोरे म्हणाले, सभासद ग्राहकांच्या मागणीवरून सांगली, आष्टा, गांधीनगर, वसगडे या ठिकाणी संस्थेच्या शाखा सुरू आहेत. शाखा सांगली येथे ४ कोटी ५ लाख ठेवी, कर्ज वाटप २ कोटी ५२ लाख, गुंतवणूक १ कोटी ६३ लाख, आष्टा गांधीनगर शाखेत ठेवी २ कोटी २ लाख, कर्ज वाटप १ कोटी ३५ लाख आहे शाखा वसगडे येथे एकूण ठेवी १ कोटी ५ लाख, कर्ज वाटप ८५ लाख आहे. गुंतवणूक २० लाख आहे.
सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करत अध्यक्ष कुमार वाडकर, उपाध्यक्ष अशोक पाटील, अनिल महाजन, दादासाहेब लोंढे, अशोक वाडकर, सर्जेराव माने, राजकुमार थोटे व सर्व संचालक, सभासद, ग्राहक यांच्या सहकार्यामुळे संस्थेने प्रगती साधली आहे, अशी माहिती सुनील कोरे यांनी दिली.