प्रताप महाडिक ।कडेगाव : सांगली लोकसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराची भिस्त कदम-देशमुख कुटुंबातील वजनदार नेत्यांच्या पलूस-कडेगाव मतदार संघातील कामगिरीवर राहणार आहे. या मतदारसंघात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीचे वारेही वाहणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून अधिक जोर लावला जाणार आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपला तोडीसतोड उमेदवार म्हणून आ. डॉ. विश्वजित कदम यांनी निवडणूक लढवावी, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह होता; परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार देत पलूस-कडेगावमधून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्याचे समजते. भाजपकडून विद्यमान खा. संजय पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या नावांची चर्चा आहे.
दरम्यान, उमेदवारी कोणालाही मिळो, पलूस-कडेगाव मतदार संघात आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी कदम-देशमुख कुटुंबातील नेत्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे. कारण काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद आ. मोहनराव कदम यांच्याकडे, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे आहे. आ. विश्वजित कदम यांच्याकडे जिल्ह्यातील काँग्रेसची जबाबदारी तर आहेच, पण ते राज्यस्तरावर कॉँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत, तर भाजपचे संग्रामसिंह देशमुख हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. यामुळे या वजनदार नेत्यांच्या होमग्राऊंडवरील कामगिरीकडे त्यांच्या पक्षाच्या हायकमांडचे लक्ष राहणार आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत पलूस-कडेगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना २७ हजार ५१९ इतके मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. पतंगराव कदम यांनी २४ हजार ३४ इतके मताधिक्य घेऊन पलूस-कडेगावचा गड अबाधित ठेवला. लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी यांच्यासह आघाडीतील मित्र पक्षांची साथ काँग्रेसला मिळणार आहे. भाजपलाही शिवसेना आणि युतीतील मित्रपक्षांची साथ मिळणार आहे.
भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत यश मिळविले आणि पलूस व कडेगाव दोन्ही पंचयात समित्यांची सत्ता घेतली. दुसऱ्या बाजूला बहुतांशी ग्रामपंचायती तसेच पलूस नगरपालिका आणि कडेगाव नगरपंचायत ही सत्ता केंद्रे ताब्यात घेऊन काँग्रेसने ताकद दाखवली आहे.
तिसऱ्या शक्तीचे आघाडीला बळपलूस-कडेगाव मतदार संघात आजवर कदम विरुद्ध देशमुख-लाड असा संघर्ष झाला. परंतु आता वरिष्ठ स्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड यांच्या तिसऱ्या शक्तीचे बळही आघाडीच्या उमेदवाराला मिळणार आहे.