सांगली : महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार व शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने या माजी गुरू-चेल्यातील वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. माने यांच्या आरोपामुळे संतप्त झालेल्या जामदार यांनी भरसभेत ध्वनिक्षेपक (माईक) महापौरांच्या दिशेने भिरकाविला. तसेच व्यासपीठासमोर येत राजदंडही उचलला. अखेर इतर सदस्यांनी हस्तक्षेप करत दोघांतील वाद मिटविला.
अमृत योजनेंतर्गत मिरज पाणीपुरवठा योजनेच्या निविदेचा ठराव राज्य शासनाने विखंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर अभिवेदन सादर करण्याची सूचना महासभेला देण्यात आले आहे.
त्यावर विचारविनियम करण्यासाठी महापौर हारूण शिकलगार यांनी विशेष सभेचे आयोजन केले होते. सभेत शिवसेनेचे नगरसेवक माने यांनी चर्चेवेळी सत्ताधारी काँग्रेसचे गटनेते जामदार यांनाच लक्ष्य केले. जामदार यांनी, सभागृहातील विषय भरकटत चालल्याने मूळ विषयावर चर्चा करण्याचा आग्रह धरला. त्यावर माने यांनी जामदार यांना चिमटा काढत ‘दादा, तुम्ही सतत गडबड करता. महापालिकेच्या १२ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. ते वाचविण्यासाठी गडबड केली असती, तर तुमचे अभिनंदन केले असते,’ असा टोला लगावला.
माने यांच्या आरोपामुळे जामदार संतप्त झाले. त्यांनी गत महासभेत झालेल्या ठरावावेळी मीच होतो. वाट्टेल ते आरोप खपवून घेणार नाही, माने यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत. तुमच्याकडे काय पुरावे आहेत, ते सादर करा, निव्वळ आरोप करू नका, असा आक्रमक पवित्रा घेत हातातील माईक महापौरांच्या आसनाच्या दिशेने भिरकावला. त्यानंतर जामदार महापौरांच्या आसनासमोर आले. त्यांनी थेट राजदंडालाच हात घातला. जामदार यांच्या आक्रमकतेमुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले.माने यांनीही, मी आता शिवसेनेचा नगरसेवक आहे. जामदार यांनी माईक फेकला, राजदंड उचलला, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करत महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली.
दोघे गुरू-चेले आमने-सामने आल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवकही धावले. धनपाल खोत, विष्णू माने, राजेश नाईक, शेडजी मोहिते यांनी दोघांनाही शांत केले. अखेर महापौर शिकलगार यांनी इतिवृत्तातून माने यांचे शब्द वगळण्याचे आदेश नगरसचिव विभागाला दिले.