सांगली : जीडीपीच्या दरावर मोजला जाणारा विकास चिंतेची बाब ठरत आहे. पुढील पिढीचा विचार करून नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व्हायला हवा, अन्यथा एका टप्प्यानंतर ऱ्हासाला सुरुवात होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी केले. सांगलीत मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात प्रा. डॉ. बी. एन. कुलकर्णी स्मृती व्याख्यानमालेत ‘देशाची प्रगती आणि निसर्ग’ या विषयावर ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यावेळी उपस्थित होते.विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी प्रस्ताविक केले. डॉ. पंडित म्हणाले, औद्योगिक धोरणात एकही थेंब सांडपाणी बाहेर सोडण्याची परवानगी नाही. किमान ३० टक्के सांडपाणी पुनर्प्रक्रिया करून वापरण्याची सक्ती आहे. प्रदूषणाचे दुष्परिणाम आपण कोरोना काळात अनुभवले. आपण काहीतरी गमावल्याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. ‘आमची परवानगी न घेताच आमची साधने का वापरली?’ असा प्रश्न पुढील पिढी विचारेल. निसर्गाचे अनुकरण केले तरच श्वासत विकासाकडे जाऊ.ते म्हणाले, वाढती लोकसंख्या भविष्यात साधनसंपत्तीला मागे टाकणार आहे. ती शक्यता टाळण्यासाठी आजचे शास्त्रज्ञ काम करत आहेत. प्रगतीसाठी पाणी व ऊर्जेची गरज आहे. समुद्राचे पाणी वापरण्यायोग्य करण्यावर मर्यादा आहेत. या स्थितीत सूर्याची ऊर्जा एकमेव अक्षय ठरते.यावेळी अनिल कुलकर्णी, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जी. आर. सावंत, एस. एम. अंगडी, सी. एस. चितळी, प्राचार्य मद्वाण्णा आदी उपस्थिती होते. उर्मिला ताम्हणकर यांनी पसायदान गायले. महेश कराडकर यांनी आभार मानले. डॉ. बी. एन. कुलकर्णी चॅरिटेबल ट्रस्टने आयोजन केले.
अमेरिकेची भूक मोठीजगातील २५ टक्के नैसर्गिक साधनसंपत्ती एकटा अमेरिका देश वापरतो. त्या वेगाने सर्वांनी वापर सुरू केला तर एकावेळी पाच पृथ्वी लागतील. युरोपसाठी साडेतीन पृथ्वी लागतील. भारत मात्र ०.७ पृथ्वी वापरत आहे. वर्षभराची ऊर्जा भारत देश २५ डिसेंबरला संपवतो. आखाती देश फेब्रुवारी-मार्चमध्येच संपवतात. हे चित्र बदलण्यासाठी शास्त्रज्ञ काम करत आहेत.