अशोक पाटील -- इस्लामपूर पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यांच्या कारभारावर सर्वसामान्य जनता नाराज आहे. विकास आराखड्याचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातच मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत ४ हजार ६७५ नवीन मालमत्ता धारकांकडून १00 टक्के वाढीव कराची नोटीस देऊन ५0 टक्केप्रमाणे २ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. कर आकारणीचा सर्व्हे करताना राजकीय दुजाभाव करण्यात आला आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांना न्याय देणार तरी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.इस्लामपूर शहरात जवळजवळ १६ हजार मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी २0१0-११ पासून ४ हजार ६७५ मालमत्ताधारक नवीन आहेत. त्यांची घरपट्टी बेसुमार वाढविण्यात आली आहे. याचा सर्व्हे करण्यासाठी स्थापत्य एजन्सीला ३८ लाख रुपयांचा ठेका देण्यात आला आहे. शहरातील या मालमत्ता धारकांपैकी ३ हजार २९५ मालमत्ता धारकांनी ५0 टक्के रक्कम भरुन घरपट्टी कमी होण्यासाठी अपील केले आहे. त्याची सुनावणी मकर संक्रांतीदिवशी (१४ व १५ जानेवारी) ठेवण्यात आली आहे.या सुनावणीत ७0 टक्के कर आकारणी कमी करावी, अशी मागणी विरोधक करणार आहेत. परंतु विरोधकांची ताकदच तुटपुंजी असल्याने त्याला कितपत यश येणार? हाही प्रश्नच आहे. न्यायालयीन लढा देऊन मालमत्ताधारकांना न्याय मिळण्यासाठी मोठा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्वच मालमत्ताधारकांना सत्ताधारी की विरोधक न्याय देणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.गेल्या चार वर्षात सत्ताधाऱ्यांनी खुले नाट्यगृह सोडले, तर एकही विकासकाम केलेले नाही. बगीचा, पोहण्याचा तलाव ही विकासकामे नूतनीकरणाच्या नावाखाली उद्ध्वस्त केली आहेत. यामध्ये आम जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. त्यातच भरीस भर म्हणून मालमत्ता धारकांना करवाढीचा दणका देण्यात आला आहे.भुयारी गटार, रस्ते, भाजीपाला मार्केट, २४ बाय ७ पाणी योजना, बोटिंग क्लब, वाहतूक कोंडी आदी प्रश्न सुटलेले नाहीत. तरीसुध्दा सत्ताधारी मंडळी वाय-फायद्वारे आपण किती हायटेक आहोत, याचा डांगोरा पिटत आहेत.विरोधकांची भूृमिका गुलदस्त्यात पालिकेतील सर्व निर्णय पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील घेतात. याला विरोध करणाऱ्या विरोधकांची संख्या अत्यल्प आहेत. त्यातच त्यांची ताकद विखुरलेली आहे. त्यामुळे त्यांनी केलेला विरोध हा नेहमीच कुचकामी ठरत आला आहे. या करवाढ प्रश्नातही विक्रम पाटील, विजय कुंभार, एल. एन. शहा हे एकत्र असले तरी, उर्वरित विरोधकांची भूमिका गुलदस्त्यात राहिली आहे.गेल्या साडेचार वर्षात खुले नाट्यगृह सोडले, तर एकही विकासकाम सत्ताधाऱ्यांनी केलेले नाही. झालेली सर्व कामे निकृष्ट आणि भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात सापडली आहेत. संक्रांतीच्या मुहूर्तावर मालमत्ताधारकांवर बेसुमार करवाढ लादली, तर आपण न्यायालयीन लढा लढू.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते.
इस्लामपुरातील मालमत्तांवर करवाढीची संक्रांत
By admin | Published: January 10, 2016 11:09 PM