सांगली : जिल्ह्यातील थकीत सेवाकर व जीएसटीच्या वसुलीसाठी सुरू केलेल्या सबका विश्वास योजनेला थकबाकीदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, बुधवारी अखेरच्या मुदतीत सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५५० थकबाकीदारांनी सहभाग घेतला. त्यांना शंभर कोटी रुपयांची सवलत मिळाली असून, जीएसटी विभागास यातून १८ कोटी मिळणार आहेत.योजनेअंतर्गत ५० लाखांपर्यंतच्या थकबाकीत ७० टक्के सवलत आणि ५० लाखांवरील थकबाकीमध्ये ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीला योजनेची मुदत डिसेंबरअखेरची होती, नंतर ती १५ जानेवारीपर्यंत वाढविली होती. बुधवारी ही मुदत संपली. रात्री उशिरापर्यंत थकबाकीदारांनी योजनेतील सहभागासाठी प्रयत्न चालू ठेवले होते.
मुदतीअखेर जवळपास ७८ टक्के थकबाकीदारांनी योजनेअंतर्गत नोंदणी करून सवलतीनंतर देय असणारी रक्कम भरण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे १८ कोटी रुपयांची थकबाकी वसुलीची हमी जीएसटी विभागाला मिळाली आहे. थकबाकीदारांना १०० कोटींची सवलत मिळण्याचे निश्चित झाले.महापालिका व जिल्हा परिषदेसही जीएसटी विभागाने थकबाकीच्या नोटिसा बजावल्या होत्या. या स्थानिक स्वराज्य संस्था भाडेतत्त्वावर इमारती देत असताना त्यांचा सेवाकर भरला नव्हता. महापालिकेकडे अशी सुमारे ८० लाखांची, तर जिल्हा परिषदेकडे सुमारे ८ लाखांची थकबाकी होती.
महापालिकेने यापूर्वी २० लाख भरले होते. आता योजनेतील सहभागामुळे थोडीच रक्कम भरून त्यांना उर्वरित ६० लाखांत मोठी सवलत मिळणार आहे. जिल्हा परिषदेलाही सुमारे ३ लाख रुपये भरून उर्वरित रकमेच्या सवलतीचा लाभ होणार आहे.