दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : बेदाण्यावरील जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. हा निर्णय केंद्राकडून झाला असला तरी, त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुुरू आहे. बेदाणा असोसिएशनसह व्यापारी आणि उत्पादकांनी मात्र जीएसटी कमी होण्याचे श्रेय खासदार संजयकाका पाटील यांनाच दिल्याने, राष्ट्रवादीकडून फुकटचा श्रेयवाद सुरू असल्याची चर्चा आहे.तासगाव आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती बेदाणा व्यापाराची मुख्य केंद्रे आहेत. महाराष्ट्रआणि कर्नाटकातील एकूण बेदाणा उत्पादन आणि व्यापारातील सुमारे निम्मा वाटा या दोन बाजारपेठांचा आहे. बेदाण्याला बारा टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय झाल्याने उत्पादकांसह व्यापारी आणि बाजारपेठेचेही भवितव्य धोक्यात आले होते. जीएसटीची अप्रत्यक्ष झळ उत्पादकांना बसणार असल्याने शेतकऱ्यांतूनही या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त झाली होती.जीएसटी रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांसह बेदाणा असोसिएशनने खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय कृषी राज्यमंत्री अर्जुनसिंंग मेघवाल, मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. बेदाणा हा शेतीमाल असून इतक्या मोठ्या प्रमाणात जीएसटी लागू झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी भूमिका या शिष्टमंडळाकडून पटवून देण्यात आली होती. त्यावेळी अर्थमंत्री जेटली यांनी जीएसटी कमी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नुकताच बारा टक्क्यांऐवजी पाच टक्के जीएसटीचा निर्णय झाला.जीएसटी कमी झाल्यानंतर तासगावात मात्र भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रेय घेण्यासाठी आटापिटा सुरू आहे. राष्ट्रवादीकडून विशेषत: बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून जीएसटी कमी करण्याचे श्रेय राष्ट्रवादीलाच असल्याचे सांगितले जात आहे, तर राष्ट्रवादीकडून केवळ श्रेयवादासाठी स्टंटबाजी केली जात असल्याची टीका करून भाजपकडून याचे श्रेय खासदारांचे असल्याचे सांगितले जात आहे. उत्पादकांसह व्यापाऱ्यांच्या बेदाणा असोसिएशननेही याचे श्रेय खासदारांना दिल्याचीही चर्चा तासगावमध्ये आहे.
जीएसटीवरून भाजप, राष्ट्रवादीत श्रेयवाद
By admin | Published: June 14, 2017 11:09 PM