इस्लामपूर : करचुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर धडक कारवाई करण्याच्या उद्देशाने जीएसटी विभागाकडून राष्ट्रीय महामार्गावर तपासणी नाके सुरू करण्यात आल्याने, व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. महामार्गावरून होत असलेल्या वाहतुकीतून जीएसटी कर चुकवून मालाची ने-आण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर करसंकलन विभागाने ही मोहीम उघडली आहे. किणी टोलनाका येथील परिसरात हे तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.या ठिकाणी असणाऱ्या पथकातील अधिकाऱ्यांकडून संशयास्पद वाटणारे प्रत्येक वाहन तपासले जात आहे. त्यामुळे महागड्या किमतीच्या वस्तूंची होणारी वाहतूक रडारवर आली आहे. मालाची वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्याकडे ई-वे बिल आहे का नाही, याची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. असे बिल नसणाऱ्या व्यापाऱ्यांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करून, करचुकवेगिरी न करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
इस्लामपूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर जीएसटी विभागाकडून किणी टोलनाका येथे तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रामुख्याने ई-वे बिलाची तपासणी होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मालाची ने-आण करताना ई-वे बिल सोबत ठेवण्याची दक्षता घ्यावी. - राजू देसाई, व्यापारी, इस्लामपूर.