लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जीएसटीअंतर्गत संशयास्पद आणि बनावट कंपन्यांच्या शोधासाठी राष्ट्रीय स्तरावरील विशेष शोध मोहीम मंगळवारपासून (दि. १६) सुरु झाली. ती १५ जुलैपर्यंत चालेल. जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत संशयास्पद आणि बनावट कंपन्यांचा शोध या मोहिमेतून घेतला जाईल.
सन २०१८ मध्ये जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर त्यातून असंख्य पळवाटा काढण्यात आल्या. त्यांचा त्या-त्यावेळी शोध घेऊन बंदोबस्त करण्यात आला. कायदेशीर कारवायादेखील झाल्या. सध्या बनावट कंपन्यांची स्थापना करुन बोगस उलाढाली दाखवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याद्वारे कोट्यवधी रुपयांच्या जीएसटीचा परतावा घेण्याच्या घटना उघडकीस येत आहे. यामध्ये शासनाची मोठी फसवणूक होत आहे. बोगस कंपन्यांच्या बोगस बिलिंगच्या वाढत्या घटनांविरोधात आता केंद्रीय व राज्याच्या जीएसटी विभागाने आघाडी उघडली आहे.
केंद्र व राज्य जीएसटी अधिकाऱ्यांकडून मोहीम राबवली जात आहे. बोगस जीएसटी नोंदणी शोधणे, संशयास्पद करदात्यांचे व्यावसायिक उलाढालीचे तपशील तपासणे, गरजेनुसार कारवाईसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवणे, प्रसंगी खटले दाखल करणे आदी कारवाया केल्या जातील. करदाता बोगस असल्याचे आढळल्यास नोंदणी तात्काळ निलंबित किंवा रद्द केली जाईल. या बोगस उलाढालीत सामिल असलेल्यांची ओळख पटवून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. त्यांनी चुकविलेला कर व्याज व दंडासह वसूल केला जाईल.