कुपवाड : माधवनगर (ता. मिरज) येथील संजय इंडस्ट्रीयल इस्टेटमधील व्यंकटेश टेक्सटाईलवर सांगलीच्या जीएसटी अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यावेळी मालकाने अधिकाऱ्यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून घेऊन फाडून टाकली. शिवाय त्यांना मारहाण करून कंपनी बाहेर हाकलून लावले. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी कंपनीमालक नीरजकुमार सुभाषचंद्र गुप्ता याच्याविरोधात कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
संजय इंडस्ट्रीयल इस्टेटमधील व्यंकटेश टेक्सटाईल या कारखान्यावर गुरुवारी दुपारी सांगलीच्या जीएसटी कार्यालयातील निरीक्षक शिवराज नथुराम भोईटे, व्यवसाय कर अधिकारी शैलेंद्र जगन्नाथ पेंढे यांसह अन्य अधिकाऱ्यांनी छापा टाकला. कर निर्धारण निरीक्षणासंदर्भात अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली.
तपासणी करीत असताना कारखान्याचा मालक नीरजकुमार गुप्ताने अधिकाऱ्यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून घेऊन तपासणी पथकातील अधिकाऱ्यांना मारहाण केली. पथकातील कर्मचाऱ्यांना कंपनीबाहेर हाकलून लावले. कर निर्धारणाची महत्त्वाची सरकारी कामाची कागदपत्रे फाडून फेकून दिली. अधिकाऱ्यांना अरेरावी व दमदाटी करून शासकीय कामात अडथळाही आणला. हा प्रकार बऱ्याचवेळ सुरू होता. याप्रकरणी व्यवसाय कर अधिकारी शैलेंद्र जगन्नाथ पेंढे यांनी कंपनीमालक गुप्ता याच्याविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात फ़िर्याद दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे तपास करीत आहेत.