सदानंद औंधेमिरज : वैद्यकीय क्षेत्रातील सेवांवर जीएसटीचा आता चंचू प्रवेश झाल्याने वैद्यकीय सुविधा महाग होण्याची भीती आहे. वैद्यकीय नगरी असलेल्या मिरजेतील वैद्यक व्यावसायिकांनी वैद्यकीय सुविधांवर जीएसटी आकारणीस विरोध दर्शविला आहे.पंचतारांकित सुविधा असणाऱ्या रुग्णालयातील सेवांसाठी आता जीएसटी आकारणी होणार आहे. इंटेन्सिव केअर युनिट ,क्रिटिकल / इंटेन्सिव कार्डियाक केअर युनिट / नियो नेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट याशिवाय रुग्णालयातील ज्या रुग्ण खोलीचे प्रतिदिन शुल्क पाच हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा रुग्णालयांना १८ जुलैपासून ५ टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे.सांगली, मिरजेत पाच हजार रुपये दैनंदिन शुल्क असलेली कार्पोरेट व पंचतारांकित रुग्णालये नाहीत. मिरजेतील सेवासदन व सिनर्जी यासारख्या काही मल्टिस्पेशालीटी रुग्णालयात साडेतीन हजारापर्यंत भाडे आहे. या निर्णयाचा मिरजेतील वैद्यकीय व्यवसायावर आता काही परिणाम होणार नसला, तरी भविष्यात वैद्यकीय सुविधांवरही जीएसटी आकारणी सुरू होण्याच्या शक्यतेमुळे वैद्यकीय सेवा महाग होण्याची भीती आहे.
अत्याधुनिक सुविधा
- मिरजेत वैद्यकीय व्यवसायाची सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. मुंबई, पुणे यासह मोठ्या शहरात उपलब्ध असलेले अत्याधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध असल्याने येथे राज्यातून व कर्नाटकातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात.
- गेल्या दहा वर्षांत एकाच ठिकाणी अनेक उपचारांची सोय असलेली मल्टिस्पेशालिटी रुग्णालये सुरू झाली आहेत. या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात अवयवरोपण, रोबोटिक सर्जरी यासह मोठ्या शहरात उपलब्ध असलेले उपचार मिरजेत उपलब्ध झाल्याने रुग्णांची सोय झाली आहे.
व्यवसायालाही फटकावैद्यकीय उपचार क्षेत्रामुळे मिरजेत मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. वैद्यकीय उपचाराशी संलग्न फार्मसी, विविध घटकांना यामुळे रोजगार मिळाला आहे. उपचार खर्च कमी असल्याने रुग्णांची व हॉस्पिटलची संख्या मिरजेत जास्त आहे. वैद्यकीय सेवा-सुविधांवर करआकारणी सुरू झाल्यास त्याचा रुग्णांसह वैद्यक व्यवसायालाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सेवा पुरविणाऱ्यांनाही जीएसटी लागूखासगी वैद्यकीय संस्था सिक्युरिटी, हाउसकीपिंग, परिचारिका या सेवा खासगी सेवा पुरवठादाराकडून घेतात. त्या सेवांवर जीएसटी लागू असल्याने सेवा पुरवठादाराने कर भरणे आवश्यक आहे. मात्र, सेवा पुरवठादार हे वैद्यकीय सेवेच्या नावाखाली कर भरणाऱ्या सेवा पुरवठादारांवर जीएसटी विभागाने कारवाईची तयारी सुरू केली आहे. यामुळे यापुढे या सेवांसाठीही जीएसटी भरावा लागणार असल्याने महागाईत भर पडणार आहे.
वैद्यकीय सुविधांवर जीएसटी आकारणीचा निर्णय चुकीचा व वेदनादायक आहे. याचा भार रुग्णांवर पडणार असल्याने यास विरोध राहिल. डाॅ. अजितसिंह चढ्ढा, माजी अध्यक्ष, मिरज आयएमए
पाच हजार दैनंदिन भाडे असलेली रुग्णालये येथे नाहीत. सामान्य रुग्णांना याचा फरक पडणार नाही. मात्र, भविष्यात ही मर्यादा कमी केल्यास रुग्णांचे खोलीभाडे कमी करून इतर शुल्क आकारणी करावी लागणार आहे. - डाॅ. रविकांत पाटील