सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी उमेदवार व समर्थकांची धावपळ सुरू असून, सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. निवडणुकीसाठी बिल्ले, झेंडे, टोप्या, एलईडी दिव्यांचे जॅकेट यांसह हायटेक प्रचार साधनांचा वापर सुरू आहे. पण प्लास्टिक बंदी व जीएसटीमुळे प्रचार साहित्याच्या किमतीत सुमारे ३० टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना तसेच महिलांसाठी बिल्ल्यांचा हार, याशिवाय प्रचार पत्रके, झेंडे, टोप्या, मफलर, बिल्ले आदी पारंपरिक प्रचार साहित्य पक्षांकडून देण्यात आले आहे. मात्र डमी मतदान यंत्र, स्टेज व्हॅन, हायड्रोलिक एलईडी डिस्प्ले व्हॅन, एलईडी सायकल डेमो, उमेदवाराचा माहितीपट, सोशल मीडियावर प्रचाराची व्हिडीओ क्लीप, एसएमएसद्वारे व्हॉईस कॉल, कलाकारांच्या आवाजात उमेदवाराच्या प्रचाराची ध्वनिफीत, पथनाट्य, मतदारांची नावे, महिला, पुरूष, जात, वय, पत्ता अशा वर्गीकरणाची सोय असलेले मोबाईल अॅप उमेदवारांना स्वखर्चाने उपलब्ध करावे लागत आहे. मोबाईल अॅपद्वारे मतदारांना बुथनुसार मतदान स्लिप मोबाईल मेसेजद्वारे पाठविण्याची सोय आहे. मोठ्या सभा, मेळावे व कोपरा सभेसाठी खुर्च्या व ध्वनिक्षेपकाची सोय असलेल्या स्टेज व्हॅन उपलब्ध आहेत. त्यांचे प्रति दिवस भाडे १० हजार रुपये, हायड्रोलिक एलईडी डिस्प्ले व्हॅनचे प्रति दिवस भाडे १० हजार रुपये आहे. उमेदवाराच्या एलईडी दिव्यांची सोय असलेल्या डेमो सायकलची सुमारे १४ हजार रुपये किंमत आहे. उमेदवाराचे चिन्ह व ध्वज असलेल्या एलईडी जॅकेटची १० हजारापर्यंत किंमत आहे. ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून उमेदवाराच्या प्रचाराचा ३० मिनिटांचा माहितीपट तयार करण्यासाठी १ लाख रुपये खर्च आहे. ८ रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत झेंडे, बिल्ल्यांचा हार २० रुपये, डमी मतदान यंत्र १५० रुपये, मफलर ५ ते १० रुपये अशा प्रचार साहित्याच्या किमती आहेत. अॅपद्वारे उमेदवार मतदारांच्या मोबाईलवर पोहोचणार असले तरी, अडाणी, अशिक्षित व स्मार्ट फोन नसलेल्या मतदारांसाठी प्रचार पत्रके व मतदान स्लिपांचा वापर करावाच लागणार आहे. हायटेक व प्रचार साधन म्हणून लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सर्व विधानसभा मतदार संघातील बुथनिहाय मतदारयादी असलेल्या मोबाईल अॅपची किंमत लाखात आहे. प्लास्टिक बंदीमुळे झेंडे, टोप्या, दुचाकीचा झेंडा अशा प्रचार साहित्यावर संक्रांत आली असून, जीएसटी करामुळे प्रचार साहित्य सुमारे ३० टक्के महागल्याचे विक्रेते शमशोद्दीन बारगीर व सुनील मोतुगडे यांनी सांगितले.चीनचे साहित्य : बाजारात आवकमहागड्या व हायटेक प्रचार साधनांचा वापर करणाºया उमेदवारांना यावेळी जीएसटी क्रमांक असलेली खर्चाची बिले द्यावी लागणार असल्याने, निवडणूक प्रचार खर्चाची मर्यादा न ओलांडण्याची कसरत करावी लागत आहे. प्रचारासाठी वापरण्यात येणाºया रिक्षाचे दररोजचे एक हजार रुपये भाडे व ध्वनिक्षेपकासाठी ८०० रुपये भाडे आहे. प्रचार साहित्यासाठी वापरण्यात येणाºया कापडावर व छपाईवर असलेला जीएसटीचा १२ टक्के दर ५ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. मात्र कच्च्या मालाचे दर वाढल्याने प्रचार साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. स्थानिक बाजारात छपाई महाग असल्याने चीनमधून छापील प्रचार साहित्याची आयात होत आहे.
Lok Sabha Election 2019 प्रचार साहित्याला जीएसटीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:20 PM