सदानंद औंधे, लोकमत न्यूज नेटवर्क, मिरज (जि. सांगली) : सण, उत्सवासाठी लागणाऱ्या सतार, तंबोरा, तबला, डग्गा, पखवाज, वीणा, हार्मोनियम, ताशा, ढोल, झांज, गिटार या तयार वाद्यांना जीएसटी नाही. मात्र, वाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुट्या भागांना १२ ते १८ टक्के जीएसटी लागू केल्याने ही वाद्ये महागली आहेत.
दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील तंतूवाद्यांना देशभरातून मागणी आहे. तंतूवाद्यांसोबतच गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासाठी वारकरी, भजनी मंडळे, वाद्य पथकांना लागणारी सर्व वाद्ये मिरजेत मिळतात. श्रावण व गणेशोत्सवात वाद्यांना मागणी असल्याने दरवर्षी मिरजेत कोट्यवधींची उलाढाल होते. येथे ढोलताशा, पखवाज, ढोलकी, वीणा, संबळ, हलगी, लेझीम, घुमका, झांज, टाळ, मृदंग, तबला डग्गा, हार्मोनियम ही वाद्ये मिळतात.पंढरपूर, आळंदी, पैठण यांसह देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व मंदिरात मिरजेतून वाद्ये जातात. मात्र, जीएसटी लागू केल्याने सर्वच वाद्यांचा स्वर महागला आहे. त्यामुळे कलावंतात नाराजी आहे.
सध्याच्या वाद्यांच्या किमती
- धनगरी ढोल लाकडी- ५ ते १२ हजार
- स्टील ढोल- २ ते ४ हजार
- ढोलकी- २ ते ३ हजार
- हार्मोनियम- ८ ते २५ हजार
- तबला डग्गा- ४ ते ६ हजार
- संबळ- दीड हजार रुपये जोडी
- टाळ- ३०० ते १२०० रुपये
- ताशा स्टील- ८०० रुपये
- तांबे पितळेचा ताशा- ५ ते १५ हजार
- झांज- ५०० ते १५०० रुपये
- आरती मशिन- ९ ते १३ हजार
मिरजेत वाद्यांच्या बाजारपेठेत दरवर्षी कोट्यवधीची उलाढाल होते. मात्र, वाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर जीएसटी आकारणी झाल्यामुळे वाद्ये दहा ते पंधरा टक्के महागली आहेत.- संजय मिरजकर, वाद्य विक्रेते, मिरज