सांगली - मिरज येथील शेतकरी विजय डांगे यांच्या अवघ्या १५ महिन्याच्या ऋतुराजला मंत्री जयंत पाटील यांच्या तात्काळ सहकार्यामुळे जीवदान मिळाले आहे. मिरज येथील रहिवासी असलेल्या शेतकरी कुटुंबातील विजय डांगे यांच्या १५ महिने वयाच्या ऋतूराज या मुलास ह्रदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले होते. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना या आजाराकडे दुर्लक्ष करता येणार नव्हता. त्यामुळे डांगे कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
सदर शस्त्रक्रिया ही किचकट व खर्चिक असल्याने मुंबई येथील कोकीळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. डांगे कुटुंबियांनी याचवेळी मदतीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता. मंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ अंबानी हॉस्पिटल येथे संपर्क साधून त्यांना डॉक्टरांचा वेळ मिळवून दिला. शिवाय जिल्हाबंदी असल्याने त्यांना प्रवासासाठी आवश्यक असणारा ई - पासही कार्यालयाने त्यांना उपलब्ध करून दिला होता. माजी नगरसेवक आयुब बारगीर यांच्या पाठपुराव्याने ही शस्त्रक्रिया डॉ. बिपीन राॅय, डॉ. प्रशांत धोपटे यांच्या प्रयत्नाने यशस्वी झाली आहे. ३ लाख २५ हजार रुपयांची शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत करणेत आली. त्यानंतर विजय डांगे कुटुंबीय समडोळी येथे परतले. आज पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी भेट देत ऋतूराजची आस्थेने विचारपूस केली. यावेळी माजी जि. प. सदस्य सुरेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती वैभव पाटील, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, बॅंकेचे संचालक संजयबापू पाटील, आयुब बारगीर, मुन्ना शेख आदी उपस्थित होते.