सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती या आठवड्यातही कायम राहिली आहे. त्यामुळे निर्बंधांबाबत रविवारी पालकमंत्री जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याची कोरोनास्थिती लक्षात घेता निर्बंध कायम राहण्याचीच शक्यता अधिक आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अद्यापही कायम असल्याने प्रशासनाने या आठवड्यात मंगळवारी निर्बंधांमध्ये अजून वाढ केली. सोमवारपर्यंत असलेले निर्बंध कायम राहणार की त्यात शिथिलता मिळणार याबाबत उत्सुकता आहे. या आठवड्यातही जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कायम होती. त्यात दोनवेळा बाराशेवर रुग्णसंख्या पोहोचली, तर मृतांची संख्याही सरासरी २०वर कायम आहे.
प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढविले असलेतरी हजारावर स्थिर असलेली रुग्णसंख्या चिंता वाढविणारी ठरत आहे.
रविवारी पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत कोरोनास्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. यानंतर पालकमंत्री स्वत: याबाबत निर्णय जाहीर करणार आहेत. गेल्या आठवड्यापासून सर्व दुकाने उघडण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करून काही प्रमाणात दिलासा मिळणार की निर्बंध कायम राहणार, याबाबत निर्णय अपेक्षित आहे.