सांगली : विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी वेळेचे बंधन घालून व्यवसाय सुरु करण्याची मागणी रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. त्यास जयंत पाटील यांनी स्पष्टपणे नकार दर्शविला. लॉकडाऊनमुळे एकवेळ वाईटपणा स्वीकारावा लागला तरी चालेल; मात्र लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील विश्रामगृहात रविवारी सायंकाळी विविध व्यापारी प्रतिनिधींनी जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी अरुण दांडेकर, विराज कोकणे, अभय गोगटे, आप्पा कोरे, अविनाश पोरे तसेच कवठेमहांकाळ येथील व्यापारीही उपस्थित होते. राज्यातील अन्य शहरात ज्याप्रमाणे विविध व्यावसायिकांना सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यापद्धतीने सांगली जिल्ह्यातही परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. व्यापारी पेठांचे पर्यायाने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे बँकांचे हप्तेही थकीत राहिल्याच्या व्यथाही मांडण्यात आल्या.
जयंत पाटील म्हणाले की, लॉकडाऊन वाढविल्यामुळे मला अनेक घटकांचा वाईटपणा स्वीकारावा लागणार आहे, याची कल्पना आहे. तरीही लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे तूर्त व्यापारास सवलत मिळणार नाही. सांगली जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सध्या चिंताजनक आहे. रुग्णसंख्या वाढलेली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठीच कडक लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. कोरोनाची साखळी कोणत्याही परिस्थितीत तोडावी लागेल. थोडे दुर्लक्ष केले तरी रुग्णसंख्या वाढत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे सध्यस्थितीत कोणतीही सवलत मिळणार नाही.
चौकट
चार दिवसांनी पुन्हा आढावा
येत्या चार दिवसात रुग्णसंख्येची काय स्थिती आहे, याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. व्यापाराला सवलत देण्याचा निर्णय हा परिस्थितीवर अवलंबून राहिल, असे जयंत पाटील म्हणाले.